बुलढाणा : यंदाच्या पावसाळ्यात सप्टेंबरच्या प्रारंभीच बुलढाणा शहर आणि परिसरातील १५ गावांसाठी एक शुभवार्ता आली आहे. दमदार पावसामुळे शहरासह १५ गावांना पाणीपुरवठा करणारे येळगाव धरण (स्व. भोंडे जलाशय) १०० टक्के भरले आहे.
यामुळे धरणाची पाच स्वयंचलित दारे उघडण्यात आली. यामुळे जिल्हा मुख्यालय असलेल्या बुलढाणा शहर आणि परिसरातील १५ गावांचा वर्षभराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला.धरणाला स्वयंचलित ८० गोडबोले द्वारे आहेत. त्यापैकी जलाशयाची ५ द्वारे उघडली आहे. याद्वारे ४०.५५ घनमीटर प्रतिसेकंदने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
बुलढाणा चिखली राज्यमार्गावर असलेल्या येळगाव धरणावरून शहर व परिसरातील १५ गावांना नगरपालिकेद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. शहरी भागात नगरपालिकेद्वारे काही भागात जुनी पाइपलाइन, तर काही भागात ‘थ्री व्हॉल्व्ह सिस्टीम’द्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यासाठी शहर परिसरातील येळगाव धरणातून जलशुद्धीकरण केंद्र व या केंद्रातून शहरातील जलकुंभात पाणी येते. त्यातून शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो.
गेल्या चार-पाच दिवसांपासून पैनगंगा नदीच्या ‘कॅचमेंट’ क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसाने नदीला पूर आला. त्यामुळे आज मंगळवार, २ सप्टेंबरला येळगाव धरण तुडूंब भरले. येळगाव धरणात पाणीसाठ्याची क्षमता १२.४० दलघमी आहे. यावर्षी सप्टेंबरच्या सुरुवातीलाच धरण १०० टक्के भरले आहे.
खडकपूर्णा ९३ टक्के, १५ दारे उघडली
बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव मही नजीकचा मोठा सिंचन प्रकल्प असलेल्या खडकपूर्णात ९३.७८ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. या प्रकल्पाची १५ दारे उघडण्यात आली असून पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. ५२०.५० दलघमी प्रकल्पाची पूर्ण संचय पातळी आहे. यामध्ये संकल्प आजची पाणीपातळी ५२०.३० इतकी आहे. ८७.५९४ एवढा दलघमी उपयुक्त जलसाठा उपलब्ध झाला आहे. यामुळे प्रकल्पाची १३ वक्रद्वारे ५० सेंमीने व २ वक्रद्वारे ३० सेंमीने उघडण्यात आली. धरणात पाण्याचा येणारा येवा लक्षात घेता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. यामुळे नदीकाठच्या ३३ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.