यवतमाळ : पैशांच्या व्यवहारातून झालेल्या वादात पाच जणांनी चाकूने वार करत तरूणाचा खून केला. ही घटना पुसद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात घडली. सुमित सुरेश पवार (२७), रा. नवलबाबा वार्ड, पुसद असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली असून त्यातील एकजण विधीसंघर्षग्रस्त बालक आहे. एक आरोपी फरार आहे.

या प्रकरणी मृताचा भाऊ शुभम पवार याने पुसद शहर पोलिसात या प्रकरणी तक्रार दाखल केली. पोलिसांनी देव दिलीप श्रीरामे (१९), दर्शन दिलीप श्रीरामे (१८), प्रेम दीपक हाके (१९) तिघेही रा. शिवाजी वार्ड, पुसद यांच्यासह एका विधीसंर्घषग्रस्त बालकास अटक केली. चारूतोष राठोड, रा. नाईक चौक हा पसार झाला. आरोपींविरूद्ध खुनासह अनुसूचित जाती, जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

पैशांच्या व्यवहारावरून नितीन तुंडलायत याचा देव श्रीरामे याच्यासोबत शुक्रवारी रात्री वाद झाला. त्यानंतर नितीन तुंडलायत, सुमित पवार, शुभम पवार, नयन तुंडलायत, आदित्य सोनवाल, रोहन जाधव, राहुल तुंडलायत हे तरूण डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात उभे असताना, दोन दुचाकींवरून आलेल्या पाच आरोपींनी सुमितच्या पाठीत चाकूने वार केले. त्याच्या बचावासाठी धावलेल्या नितीन तुंडलायत, शुभम पवार, नयन तुंडलायत यांच्यावरही वार केले. हे तिघे या हल्ल्यात जखमी झाले.

हल्ल्यात सुमित पवारचा जागीच मृत्यू झाला, तर नितीन तुंडलायत गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी नांदेड येथे पाठविण्यता आले आहे. उर्वरित दोन जखमींवर पुसदच्या उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने पुसद शहरात खळबळ उडाली असून, हा टोळीयुद्धाचा प्रकार असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

विजेच्या धक्क्याने बालिकेचा वाढदिवशीच मृत्यू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घराच्या अंगणातील झाडाची फुले तोडत असताना तोल जावून कुलरवर पडून विजेचा जबर धक्का बसल्याने सहा वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. ही घटना पांढरकवडा तालुक्यातील पाटणबोरी येथील खडकपुरा परिसरात घडली. आयेशा रमजान शेख असे मृत बालिकेचे नाव आहे. शनिवारी आयेशाचा वाढदिवस होता. ती अंगणातील झाडांची फुले तोडत असताना तोल गेल्याने तिच्या हाताचा कुलरला स्पर्श झाला. त्यावेळी तिला विेजेचा जबर धक्का बसला. तिच्या ओरडण्यामुळे तिची आई धावत बाहेर आली. तिने आयेशाला उचलण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिलाही विजेचा धक्का बसला व ती फेकल्या गेली. बेशुद्ध पडलेल्या आयेशाला तत्काळ दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. वाहन चालक असलेल्या रमजान शेख यांना तीन मुली आहेत. आयेशा ही सर्वात लहान मुलगी होती. ऐन वाढदिवशी तिचा असा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे