अनिल कांबळे, लोकसत्ता 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : महिला पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस ठाण्याचा पदभार देण्यात राज्यात मुंबई शहर प्रथम क्रमांकावर आहे. द्वितीय क्रमांक नागपूर शहर आयुक्तालयाचा लागतो. नागपूर आयुक्तालयात तब्बल पाच महिला पोलीस अधिकाऱ्यांना ‘ठाणेदारी’ देण्यात आली असून त्यांनी आतापर्यंत यशस्वी कारभार सांभाळला आहे. 

नागपूर पोलीस आयुक्तालयात २८ पोलीस ठाण्यांवरून ३३ पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली. आणखी तीन पोलीस ठाणे प्रस्तावित आहेत. त्यापैकी तब्बल पाच पोलीस ठाण्यांचे नेतृत्व महिला अधिकाऱ्यांकडे आहे.  आयुक्त अमितेश कुमार यांनी महिला व पुरुष असा कोणताही भेदभाव न करता महिला पोलीस अधिकाऱ्यांना ठाण्यांची जबाबदारी सोपवली आहे. नागपूर पोलीस विभागाच्या इतिहासात पहिल्यांदाच पाच महिला अधिकाऱ्यांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर नियुक्त करण्यात आले आहे. यामध्ये प्रतापनगर पोलीस ठाण्याचे नेतृत्व विद्या जाधव, वाठोडा पोलीस ठाण्याचे नेतृत्व आशालता खापरे, मानकापूर पोलीस ठाण्यात वैजवंती मांडवधरे, बजाजनगर पोलीस ठाण्यात शुभांगी देशमुख आणि वाडी पोलीस ठाण्याचे नेतृत्व ललीता तोडासे यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. आशालता खापरे यांना शहरातील वाहतूक विभागाच्या पहिल्या महिला पोलीस प्रभारी म्हणून मान मिळाला आहे. तसेच मानवी तस्करी प्रतिबंधक पथक (एएचटीयू) विभागाचे नेतृत्व पोलीस निरीक्षक मंदा मनगटे आणि रेखा संकपाळ यांच्याकडे आहे. भरोसा सेलचे नेतृत्व सीमा सूर्वे, उज्ज्वला मडामे यांच्याकडे आहे. सामाजिक सुरक्षा विभागाच्या प्रमुखपदावर कविता ईसारकर, मंगला हरडे या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

उपराजधानीत पहिल्यांदाच महिला सहआयुक्त 

नागपूर पोलिसांच्या इतिहासात प्रथमच सहपोलीस आयुक्त पदावर आयपीएस अश्वती दोरजे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दोरजे यांच्याकडे शहरातील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी आहे. तसेच आयपीएस विनीता साहू, लीस उपायुक्त चेतना तिडके यांचीही नियुक्ती नागपूर पोलीस आयुक्तालयात महत्त्वाच्या पदावर करण्यात आली आहे.  

पोलीस दलात अशीही चर्चा

शहर पोलीस दलात तब्बल पाच महिला अधिकारी ठाणेदार आहेत. महिला अधिकाऱ्यांचा पोलीस दलात स्वच्छ कारभार असल्याने सामान्य नागरिक, दुकानदार, हॉटेलचालक, बार-रेस्ट्रॉरेंट चालक आणि व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले आहे. पुरुष ठाणेदार असल्यास पोलीस ठाण्यात आलेल्या पाहुण्यांसाठी चहा, कॉफी, नाश्ता, पाण्याच्या बाटल्या हॉटेलातून नि:शुल्क मागवल्या जातात. हॉटेल, सावजी ढाबा, वाईन शॉप, बार-रेस्ट्रॉरेंट मालकांना तर पोलीस ठाण्यातील काही कर्मचारी ठाणेदाराचे नाव सांगून दारूच्या बाटल्या, मटन-चिकन थाली मागतात, अशी चर्चा आहे. 

राज्यातील चित्र असे..

मुंबई पोलीस आयुक्तालयात ९० पोलीस ठाणी असून जवळपास डझनभर महिलांकडे नेतृत्व  आहे. पुणे शहरात ३२ पोलीस ठाणी असून त्यापैकी ३ महिला अधिकाऱ्यांना ठाणेदारी देण्यात आली आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयात केवळ १ महिला अधिकाऱ्याकडे ही जबाबदारी आहे तर औरंगाबाद आयुक्तालयात २ महिला अधिकारी ठाणेदार आहेत. नागपुरात ५ महिला ठाणेदार आहेत.

पोलीस खात्यात महिला किंवा पुरुष असा कोणताही भेदभाव नसतो. त्यामुळे गुणवत्तेच्या आधारावर ठाणेदारी दिली जाते. महिला पोलीस अधिकाऱ्यांनी आतापर्यंत यशस्वीपणे ठाण्याचा कारभार सांभाळला आहे. 

अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, नागपूर.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Five police stations headed by women officers in nagpur zws
First published on: 23-02-2022 at 01:20 IST