विभागात आठवड्याभरात ३५५ रुग्णांची भर

नागपूर : करोनानंतर नागपूर विभागातील गोंदिया व गडचिरोली हे दोन जिल्हे वगळता इतर चार जिल्ह्यांत डेंग्यूचा प्रकोप सुरू आहे. आठवड्याभरात येथे ३५५ नवीन रुग्णांची भर पडली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत विभागातील सहा जिल्ह्यांत या आजाराचे मृत्यू पाच पटींनी वाढल्याने चिंता वाढली आहे. सर्वाधिक रुग्ण व मृत्यू नागपूर जिल्ह्यातील आहेत, हे विशेष.

नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांत १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२० या एक वर्षात डेंग्यूचे ५०२ रुग्ण आढळले होते. त्यात सर्वाधिक १६० रुग्ण हे नागपूर जिल्ह्यातील होते. त्यातील नागपूर शहर व ग्रामीण भागातील प्रत्येकी १ असे एकूण दोन मृत्यू झाले. इतर जिल्ह्यांत एकही मृत्यू नव्हता. परंतु १ जानेवारी ते ३१ जुलै २०२१ या गेल्या सात महिन्यांत विभागात ८६९ रुग्ण आढळले.  उपचारादरम्यान ११ मृत्यू झाले. यापैकी ९ मृत्यूंची नोंद आरोग्य विभागात झाली असून मेडिकल, मेयोत झालेले प्रत्येकी १ अशा दोन मृत्यूंची नोंद सध्या प्रलंबित आहे. विभागातील सर्वाधिक ६१३ रुग्ण व ६ मृत्यू हे एकट्या नागपूर जिल्ह्यातील आहेत.  वर्धेत १२०, भंडाऱ्यात १३, गोंदियात ८, चंद्रपूर ग्रामीणला ५२, चंद्रपूर महापालिका हद्दीत  ६२, गडचिरोलीत १ रुग्ण आढळला.

त्यातच सात दिवसांत विभागातील चार जिल्ह्यांत रुग्णसंख्या वाढली आहे. २२ जुलै ते ३१ जुलै दरम्यान नागपूर ग्रामीणला १२६, शहरात ११७, वर्धेत २२, भंडाऱ्यात ६, चंद्रपूर ग्रामीणला ३०, चंद्रपूर महापालिका हद्दीत ५४ असे एकूण ३५५ रुग्ण आढळले.