नागपूर: नागपूर जिल्यातील उमरेड एमआयडीसीत असलेल्या एमएमपी इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीत शुक्रवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास मोठा स्फोट झाला. – यात पाच कामगारांचा मृत्यू तर पाचहून अधिक कामगार जखमी झाले आहेत. यातील काहींची प्रकृती चिंताजनक आहे. एकूण जखमींपैकी नऊ रुग्णांना मेडिकलमध्ये हलवण्यात आले होते.

नागपुरातील उमरेड एमआयडीसी परिसरातील कंपनीत सायंकाळी ६ वाजता स्फोट झाल्याची माहिती मिळताच पोलिस यंत्रणा, अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत गंभीर जखमी झालेल्या कामगारांना प्रारंभी उपचारासाठी उमरेडच्या खासगी रुग्णालयात व नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) दाखल केले होते.

रात्री उशिरा बहुतांश जखमी कामगारांना नागपूर येथे आणण्यात आले. त्यापैकी दोघांचा मेडिकलमध्ये मृत्यू झाला. तर तिघे कंपणीतच दगवल्याच्या वृत्ताला पोलीस अधीक्षकांनी दुजोरा दिला. उमरेड एमआयडीसीत एमएमपी ही अँल्युमिनियम फॉइल आणि पावडर तयार करणारी कंपनी आहे. अँल्युमिनियम फॉइल आणि पावडरचा वापर पॅकेजिंगसाठी करण्यात येतो.

सदर कंपनीत ज्या मशीनमध्ये अँल्युमिनियम पॉलिशचे काम केले जाते, ती मशीन हाताळत असताना, कंपनीत अचानक स्फोट झाला. घटनेची माहिती मिळताच नागपूर ग्रामीणचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक रमेश धुमाळ, उपविभागीय पोलिस अधिकारी वृष्टी जैन, उमरेडचे ठाणेदार धनाजी जळक आणि पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. त्यांनी अग्निशमन दलासह रुग्णवाहिकांना पाचारण करून स्फोटातील जखमी कामगारांना बाहेर काढत उपचारासाठी नागपूरच्या मेडिकलमध्ये रवाना केले.

दरम्यान, नागपूर महापालिकेच्या लकडगंज आणि सक्करदरा झोनमधील दोन अग्निशमन वाहने आणि सात जवान घटनास्थळी रवाना करण्यात आले. आमंदार संजय मेश्राम, माजी आमदार सुधीर पारवे, राजू पारवे यांनी घटनास्थळी भेट देत कामगारांशी संवाद साधला. कंपनीत एकूण ४५० कामगार आहेत. सायंकाळच्या शिफ्टमध्ये अंदाजे १५० कामगार कामावर होते. स्फोट झाल्यावर आगीचा भडका उडाल्यावर अनेक जण जीव मुठीत घेऊन बाहेर धावत सुटले. यामुळे अनेक कामगार थोडक्यात बचावले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जखमींची नावे…. पीयूष बाबाराव टेकाम (२१) रा. पांजरेपार, पीयूष वासुदेव दुर्गे (२०) रा. पांजरेपार, मनीष अमरनाथ वाघ (२०) रा. पेंढराबोडी, करण भास्कर बावणे (२१) पेंढराबोडी, करण तुकाराम शेंडे (२०) रा. गोंडबोरी, कमलेश सुरेश ठाकरे (३०) रा. गोंडबोरी,  सचिन पुरुषोत्तम मसराम (२६) रा. पांजेरपार), नवनीत कुंभारे (२७) रा. पांजरेपार अशी जखमींची नावे आहेत. हे सर्व कामगार भिवापूर तालुक्यातील राहणारे आहेत.