विदर्भातील अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती ; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील बोरी अरब येथील निर्माणाधिन पूलावरून पाणी वाहत असल्याने यवतमाळ-दारव्हा मार्गावरील वाहतूक बंद आहे.

विदर्भातील अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती ; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
गडचिरोली, वर्धा, अमरावती जिल्ह्यात नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळे काही गावांचा संपर्क तुटला आहे.

नागपूर : उपराजधानीसह संपूर्ण विदर्भात पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. अनेक जिल्ह्यात पूरस्थिती उद्भवली असून गडचिरोली, वर्धा, अमरावती जिल्ह्यात नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळे काही गावांचा संपर्क तुटला आहे. बोर प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात येणार असल्याने परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.  नागपूर, वर्धा, भंडारा, अमरावती जिल्ह्याला मुसळधारेचा इशारा दिला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात इरई धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले. गडचिरोली जिल्ह्यात मूलचेरा-आष्टी, आलापल्ली-भामरागड आदी मार्ग बंद आहेत. वर्धा जिल्ह्यात हिंगणघाट तालुक्यातील पोथरा नदी पुलावरून पाणी वाहत असून सावंगी-हेटी, हिंगणघाट-पिंपळगाव आदी मार्ग बंद झाले आहेत. पहाटे काही घरात पाणी शिरले. अकोला जिल्ह्यात देखील रात्री मुसळधार पाऊस झाला. नागपूर शहरात  कळमनासह काही वस्त्यांमध्ये पाणी शिरले. अमरावती जिल्ह्यात रविवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे  जनजीवन विस्कळीत झाले असून वरूड तालुक्याला पुराचा मोठा फटका बसला आहे. वरूड शहरातील सखल भागात पुराचे पाणी शिरून मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय सातनूर, गव्हाणकूंड, बहादा, शेंदूरजनाघाट येथे पूरस्थिती आहे.  हजारो गावकऱ्यांना रात्र जागून काढावी लागली. वरूड-अमरावती महामार्गावरील पूल पाण्याखाली गेल्याने वरूड ते जरूड मार्गावर संपर्क तुटला. यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील बोरी अरब येथील निर्माणाधिन पूलावरून पाणी वाहत असल्याने यवतमाळ-दारव्हा मार्गावरील वाहतूक बंद आहे.

बिबटय़ाच्या पिल्लाचा बुडून मृत्यू

उपराजधानीतील बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाच्या बाहेरील मोकळय़ा वनक्षेत्रातील नाल्यात सोमवारी बिबटय़ाचे दोन ते तीन दिवसाचे पिल्लू पाण्यात बुडालेल्या अवस्थेत आढळले.  गोरेवाडा प्रकल्पातील वन्यप्राणी बचाव केंद्रात पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुजीत कोलंगथ, डॉ. मयूर पावशे यांनी शवविच्छेदन केले असता या पिल्लाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. गोरेवाडा प्रकल्पाचे विभागीय व्यवस्थापक शतनिक भागवत, सहाय्यक वनसंरक्षक विजय सूर्यवंशी, वनपरिक्षेत्र अधिकारी नीलय भोगे, वनपाल सुरेश चाटे, वनरक्षक लता मांढळकर, वनमजूर राजन वासनिक यांच्या उपस्थितीत बिबटय़ाच्या पिल्लावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
गोंदिया बलात्कारप्रकरणी दोन पोलीस निलंबित ; एका महिला पोलिसाची बदली
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी