• वाहनचालकांकडून नियमांचे उल्लंघन
  • सुरक्षा व्यवस्थेचा अभाव

मुख्य रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी सरकारने शहराच्या विविध भागात उड्डाणपूल बांधले आहेत. या उड्डाणपुलांमुळे रस्त्यांवरील वाहतुकीची कोंडी कमी झाली असली तरी दुसरीकडे उड्डाणपुलांवर वाहन चालविताना पाळावयाचे नियम वाहनचालक धाब्यावर बसवत आहेत. त्यामुळे हे उड्डाणपूल हळूहळू अपघातांची केंद्रे बनत चालली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर मेट्रो शहर म्हणून नावारूपास येत आहे. हे शहर देशाचे केंद्रस्थान असून, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ आणि ७ शहरातूनच जातात. नागपूर मध्यवर्ती रेल्वेस्थानकावर दररोज २४२ रेल्वेगाडय़ांची ये-जा चालू असते. साहजिकच नागपुरातून ये-जा करणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी शहराच्या विविध भागात १३ उड्डाणपूल बांधण्यात आले आहेत. यात पाचपावली, रेल्वेस्थानक, दहीबाजार, सक्करदरा, छत्रपती चौक, झिंगाबाई टाकळी, माणकापूर, दिघोरी रिंगरोड, कडबी चौक, सीताबर्डी, कळमना, नरेंद्रनगर आणि सदर या भागातील उड्डाणपुलांचा समावेश आहे.

सिग्नल नसला तर वेळ न घालवता नागरिक उड्डाणपुलांचा उपयोग करतात. मात्र, गाडी चालविताना वेगमर्यादा विसरतात. शिवाय चौकात जाऊन यू-टर्न न मारता उड्डाणपुलावरूनच वेडेवाकडे वळण घेत वा यू-टर्न घेऊन गाडी वळवितात. यामुळे शहरात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. नागपूर-भंडारा महामार्गावरील कापसी येथील उड्डाणपुलावर एका टिप्परने इनोव्हा कारला धडक दिली आणि छत्तीसगढ राज्यातील राजेश लोढा यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना ताजीच आहे.

गेल्या २२ एप्रिलला माहिती व जनसंपर्क कार्यालयातील माहिती सहाय्यक प्रभाकर बाराहाते हे छत्रपती उड्डाणपुलावरून सिव्हील लाईन्स येथील कार्यालयात जात असताना साईप्रसाद दांडेकर हे (एमएच-बीसी-३५११ ) कारने आले.

उड्डाणपुलावर त्यांनी बाराहाते यांच्या पुढे जावून मागील वाहनांचा विचार न करताना अचानक यू-टर्न घेतला. त्यामुळे बाराहाते यांचा अपघात झाला आणि त्यांच्या पायाचे हाड तीन ठिकाणी मोडले.

त्यानंतर वाहनचालकाने गाडी थांबवणे आवश्यक असताना तो सुसाट वेगाने निघून गेला. या वाहनावर अद्याप कारवाई झालेली नाही. या अपघातामुळे बाराहाते यांच्या पायाची शस्त्रक्रिया करावी लागली. त्यामुळे उड्डाणपुलांवरून गाडी चालविताना वाहनचालकांना काळजी घेणे आवश्यक आहे. शिवाय उड्डाणपुलावर कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था नसते. त्यामुळे सातत्याने असे अपघात घडत आहेत.ू

अकरा महिन्यांत ९८८ अपघात

१ जानेवारी ते ३० नोव्हेंबर २०१५ या कालावधीमध्ये शहराच्या विविध रस्त्यांवर आणि उड्डाणपुलांवर ९८८ अपघात झाले. त्यापैकी रिंगरोडवर १५० आणि शहरातील रस्त्यांवरील ८३८ अपघातांचा समावेश आहे. या अपघातांमध्ये ८७३ लोक जखमी झाले तर १७४ लोकांचा मृत्यू झाला. त्यामुळे अपघातांमध्ये मृत्यू पावणाऱ्यांची संख्या मोठी असून ती कमी करण्यासाठी वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Flyover becoming accidental centre
First published on: 30-04-2016 at 04:50 IST