अकोला : नोकरीचा शोध घेणाऱ्या तरुण उमेदवारांना विदेशात नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. विविध पदांसाठी होणाऱ्या पदभरतीमध्ये नियुक्त झाल्यानंतर तब्बल दीड लाखावर पगार दिला जाणार आहे. किमान बारावी उत्तीर्ण ही पात्रता असून निवास जेवण व इतर व्यवस्था संबंधित कंपनीकडून केली जाणार असल्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्य विभागामार्फत सांगण्यात आले.

महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्य विभागामार्फत वाशीम जिल्ह्यातील युवक-युवतींना परदेशात करिअर घडविण्याची एक ऐतिहासिक संधी उपलब्ध झाली आहे. इस्राईलमध्ये काळजीवाहू सेवेमध्ये तब्बल पाच हजारावर जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली असून पात्र उमेदवारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वाशिमचे सहाय्यक आयुक्त प्रवीण खंडारे यांनी केले.

अर्हता व निकष काय?

इस्राईलमध्ये काळजीवाहू सेवेमध्ये पाच हजारावर जागांसाठी होणाऱ्या पदभरतीत वयोमर्यादा २५ ते ४५ वर्षे असून महिला व पुरुष उमेदवार पात्र आहेत. शैक्षणिक अर्हता किमान बारावी उत्तीर्ण आहे. उमेदवाराची किमान उंची १.५ मीटर व किमान वजन ४५ किलो असणे गरजेचे आहे. आरोग्य प्रमाणित असणे आवश्यक राहील.

काळजीवाहक प्रशिक्षण आवश्यक

संबंधित उमेदवारांना किमान ९० तासांचे काळजीवाहक प्रशिक्षण आवश्यक राहणार आहे. फिजिओथेरपिस्ट, नर्सिंग असिस्टंट, ए.एन.एम., जी.एन.एम., बी.एस्सी. नर्सिंग, पोस्ट बी.एस्सी. नर्सिंग, आयुर्वेद व होमिओपॅथिक नर्सिंग अशा पदवीधारकांना विशेष प्राधान्य दिले जाणार आहे.

नोकरीची वैशिष्ट्ये काय?

निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन सुमारे एक लाख ५६ हजार ६८५ रूपये असून भोजन, निवास व वैद्यकीय सुविधा नियुक्ती करणाऱ्यामार्फत मोफत उपलब्ध करून दिल्या जाईल. संबंधित नोकरीचा करार कालावधी किमान पाच वर्षे राहणार आहे. प्रतिष्ठित व दीर्घकालीन नोकरीची हमी राहील. इच्छुक उमेदवारांना फक्त ऑनलाईन अर्ज करावा लागेल.

यासाठी https://maharashtrainternational.com/jobDetail.aspx या संकेतस्थळाला भेट द्यावी लागणार आहे. अर्ज प्रक्रियेत अडचण आल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात थेट संपर्क साधता येईल. इस्राईलमध्ये रोजगार मिळविण्याची ही संधी युवक-युवतींसाठी नवी दिशा ठरेल. इच्छुकांनी तातडीने अर्ज करून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त प्रवीण खंडारे यांनी केले आहे.