भंडारा : वन विभाग कधीच कोणत्या वाघाला किंवा वाघिणीला टोपण नाव देत नाही, वाघ – वाघिणीचे बारसे करून टोपण नावे ठेवण्याचे काम अर्थात “आत्याबाई” होण्याचे काम वनविभाग करीत नसल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल नवेगाव नागझिरा येथे आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात काल ब्रह्मपुरी वन परिक्षेतत्रातील दोन वाघिणी सोडण्यात आल्या. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत हे स्थानांतरण झाले आहे. आपल्याकडे लोकप्रिय झालेल्या वाघ किंवा वाघिणीना जय, राजकुमारी, मुन्ना, कॉलरवाली, अवनी अशाप्रकारे  टोपण नावे दिली जातात त्यामुळे नवेगाव नागझिरा येथे आलेल्या या नवीन वाघिणीना आता कोणती टोपण नावे देण्यात येतील असे विचारले असता  वन विभाग ” आत्याबईच ” कामं कधीच करीत नाहीत, असे मुनगंटीवार यांनी म्हणताच हास्यकल्लोळ झाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ते म्हणाले की, राजकारणातही टोपण नावे ठेण्याची आता प्रथा सुरू झाली आहे, तसचं वन्यप्राण्यांना देखील टोपण नावे ठेवण्याचे काम लोक किंवा पर्यटक करीत असतात. मात्र वाघ – वाघिणीचे बारसे करणे किंवा त्यांना टोपण नावे देते हे वन विभागाच्या नियमावलीत बसत नाही. वनविभागाच्या कोणत्याही प्रेस नोट मध्ये टोपण नावे नसतात. त्याऐवजी टी १, टी २ अशीच नावे असतात. त्यामुळे कोण काय नाव ठेवेल याचा वन विभागाशी संबंध नाहीच. आणि जर वन विभागाच्या प्रेस नोट मध्ये असे टोपण नाव लिहिले असेल तर त्यावर निश्चित कारवाई केली जाईल अशी सूचना ही त्यांनी यावेळी दिली.