अमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अकोट वन्यजीव परीक्षेत्रातील पूर्व जितापूर बिटमध्ये प्रगणनेच्या कामासाठी गेलेल्या वनमजुरावर अस्वलाने हल्ला केल्याने या वनमजुराचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली. रसूल रुस्तम मोरे असे मृत वनमजुराचे नाव आहे.
सध्या मेळघाट वन्यजीव विभागात वनमजुरांच्या माध्यमातून उन्हाळापूर्व कामे करण्यात येत आहेत. पूर्व जितापूर बिटमध्ये वनरक्षक पी.एस. सोगे, वनमजूर रसूल मोरे आणि रोजंदारी मजूर सुरेंद्र धिकार सोलकर हे प्रगणन रेषा आणि नियमित गस्तीवर गेले असताना सकाळी ८ वाजताच्या सुमारास एका नाल्याजवळ लहान पिल्ल्यांसह फिरत असलेल्या अस्वलाने अचानकपणे रसूल मोरे यांच्यावर हल्ला चढवला.
हेही वाचा – जिंकण्याची क्षमता असेल तरच जागा मागा, शहा यांनी शिंदे-पवारांना बजावले !
तिघांनीही या अस्वलाचा प्रतिकार करीत हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. पण, या हल्ल्यात रसूल मोरे गंभीररीत्या जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी रुग्णवाहिका पाठविण्यात आली. रसूल मोरे यांना अकोट येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, पण त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
हेही वाचा – राज्यात पुन्हा १० हजार शिक्षकांची भरती, कोणत्या महिन्यात होणार टीईटी? जाणून घ्या…
रसूल मोरे यांच्या कुटुंबीयांना तत्काळ आर्थिक मदत देण्यात आली असून इतर लाभ मिळवून देण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी दिली.
हेही वाचा – पालकांनो पाल्यांचा शाळेमध्ये प्रवेश घेत असाल तर याची खात्री करून घ्या, अन्यथा…
दोन वर्षांपूर्वी अकोट वन्यजीव विभागातच पोपटखेड परिसरात एका अस्वलाच्या हल्ल्यात वनमजूर गंभीररीत्या जखमी झाला होता. तर सुमारे दहा वर्षांपूर्वी मेळघाट व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातील जारिदा येथे अस्वलाने केलेल्या हल्ल्यात एका वनरक्षकासह चार जणांचा मृत्यू झाला होता.