चंद्रपूर: जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील विहीरगाव, मूर्ती गावात प्रस्तावित ‘ग्रीनफिल्ड’ विमानतळाचा प्रस्ताव केंद्रीय वन सल्लागार समितीने फेटाळून लावला आहे. विमानतळासाठी प्रस्तावित केलेली जागा ही वन्यप्राण्यांच्या अधिवासासाठी महत्त्वाची जागा असल्याचे कारण देत हा प्रस्ताव फेटाळून लावल्याने राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

वन सल्लागार समिती ही केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाची वैधानिक संस्था आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील प्रस्तावित विमानतळाच्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी समितीची ७ जुलै रोजी बैठक झाली. या बैठकीत समितीने विमानतळाचा हा प्रस्ताव फेटाळला. हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी समितीपुढे जोरदार प्रयत्न केले मात्र, समितीने त्यांचा युक्तिवाद मान्य केला नाही. विमानतळासाठी प्रस्तावित केलेली जागा ही वन्यप्राण्यांच्या अधिवासाची महत्त्वाची जागा असून, येथे विमानतळ बांधल्यास मानवाचा हस्तक्षेप वाढेल, असे कारण समितीने दिले.

हेही वाचा… ‘आययुसीएन’च्या यादीतील संकटग्रस्त गिधाड उपचारासाठी नागपुरात!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विशेष म्हणजे, राज्याचे वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे गेल्या अनेक वर्षांपासून चंद्रपूर जिल्ह्यात विमानतळ व्हावे यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. प्रदीर्घ प्रयत्नांनंतर त्यांनी विहीरगाव-मूर्तीजवळील राजुरा तालुक्यातील जमीन विमानतळासाठी निश्चित करण्यात आली होती. या प्रस्तावित विमानतळासाठी ६३ हजार हेक्टरहून अधिक वनजमीन वळवण्याची गरज आहे. मात्र, हे विमानतळ ज्या भागात प्रस्तावित आहे तेथे वाघ आणि इतर वन्यप्राण्यांचे वास्तव्य आहे. तसेच जिल्ह्यातील नव्याने निर्माण झालेले कन्हाळगाव अभयारण्य विमानतळाच्या प्रस्तावित जागेपासून जवळच आहे. या विमानतळामुळे परिसरातील वाघांच्या नैसर्गिक कॉरिडॉरला धोका निर्माण होऊ शकतो, असे कारण देत समितीने अहवाल फेटाळून लावला आहे.