बुलढाणा : नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गवर ाआजवर झालेले लहान मोठे अपघात, दरोड्याच्या घटना, सुसज्ज टोळ्यांद्वारे वाहनातून होणारी इंधन चोरी यामुळे हा मार्ग टिकेचा विषय ठरला.
राज्य शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प ठरलेला व दस्तूरखूद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झालेल्या समृद्धी महामार्गांवर नियमित अंतराने होणारे अपघात चिंतेचा आणि चिंतनाचा विषय ठरले आहे. ठराविक अंतराने होणाऱ्या या अपघातांची दुर्दैवी मालिका सन २०२४ प्रमाणेच चालू २०२५ या वर्षातही कायम आहे .
अपघात झाले की यंत्रणा हालचाल करते आणि नंतर ‘जैसे थे ‘ होऊन जाते. या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते माजी मंत्री, सुबोध सावजी यांनी राज्यकर्त्याचे कान टोचले असून अपघात संदर्भात उपयुक्त सूचना देखील केली आहे.
लेखी पत्रच..
मेहकरचे माजी आमदार सुबोध सावजी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांना लेखी निवेदन पाठविले आहे.
प्रारंभीपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या समृद्धी महामार्ग प्रवासाकरिता अतिरेकी ठरल्याचे नमूद करुन या अतिरेकी मार्गाचा ‘बंदोबस्त ‘ करण्याची मागणी त्यांनी केली आहे. आजवरच्या काळात समृद्धी वर ५०० बळी गेल्याचा दावा त्यांनी केला आहे. अनेक वाहनांची मोडतोड झाली.
ही बाब राज्य शासनासाठी ‘लांछन’ असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे. या अतिरेकी मार्गावर अजून किती बळी जाणार, किती अपघात होणार हे सांगता येत नाही. त्यामुळे या अतिरेकी मार्गाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
टोल नाक्यावरच विमा काढावा
राज्य रस्ते विकास महामंडळाने अलीकडेच समृद्धी महामार्गचा टोल टॅक्स वाढविला आहे. या करातूनच प्रवाशांचा अपघाती विमा काढण्यात यावा, अशी सूचना सुबोध सावजी यांनी केली आहे. प्रवासी ज्या प्रवेश द्वार वरून प्रवास सुरु करणार तिथूनच त्यांचा अपघाती विमा काढावा, अशी मागणी त्यांनीनिवेदनात केली आहे.