बुलढाणा: स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी सातत्याने चळवळ करणारे माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप यांनी बुलढाण्यात आंदोलनाचा निर्धार बोलून दाखविला. “३१ डिसेंबर २०२३ पूर्वी करू वा मरू, पण विदर्भ राज्य मिळवूच,” असा दावा त्यांनी येथे केला. तसेच २७ डिसेंबरपासून विदर्भव्यापी आंदोलनाची घोषणा करून स्वतंत्र विदर्भ राज्याच्या आपल्या मागणीसाठी नव्याने रणशिंग फुंकले!…

स्थानिक शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी (दि. १५) संध्याकाळी जिल्ह्यातील विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. यावेळी पुढील आंदोलनावर विचारविनिमय करण्यात आला. यानंतर तिथेच आयोजित पत्रपरिषदेत त्यांनी नियोजित आंदोलनाची माहिती दिली. अकोला जिल्ह्यात २० डिसेंबरला पश्चिम विदर्भ स्तरीय ‘विदर्भ निर्माण संकल्प मेळावा’ आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. अकोला जिल्ह्यातील कान्हेरी सरप येथे दुपारी १ ते ५ वाजतादरम्यान हा मेळावा लावण्यात आला आहे.

बेमुदत उपोषण आणि रस्ता रोको

२७ डिसेंबरपासून नागपूर येथील संविधान चौकात बेमुदत उपोषण सुरू करण्यात येणार आहे. या मध्ये वामनराव चटप, महिला आघाडीच्या अध्यक्षा रंजना मामर्डे, पूर्व विदर्भ अध्यक्ष अरुण केदार, युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष मुकेश मासुरकर, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे, अ‍ॅड. वीरेंद्र जैस्वाल यांचेसह विदर्भातील प्रमुख सहकारी सहभागी होणार आहेत. बुलढाण्यात राम बारोटे, तेजराव मुंडे, सुरेश वानखेडे, दामोदर शर्मा, कैलास फाटे ,प्रकाश अवसरमोल हे उपोषण करणार आहेत. या आंदोलनाला पाठींबा म्हणून विदर्भातील ११ जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको करण्यात येणार असल्याचे अ‍ॅड. चटप यांनी सांगितले.

हेही वाचा… वाशिम: मागास समाजावर अन्याय, अत्याचार सुरूच! दहशतीमुळे महिला, लहान मुलांसह अनेकांनी सोडले गाव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केंद्र सरकारने स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करावी, विदर्भात येऊ घातलेले २ औष्णिक प्रकल्प विदर्भा बाहेर न्यावे, वीज दरवाढ व कृषी पंपा साठी असलेले दिवसाचे लोडशेडिंग रद्द करावे आदी १० मागण्यासाठी हे विदर्भ व्यापी आंदोलन करण्यात येणार असल्याचे चटप म्हणाले. यावेळी रमाकांत महाले, श्याम अवथळे, सुभाष विणकर, भास्कर लहाने, प्रकाश इंगळे आदि हजर होते.