गोंदिया : आजची भाजपा विचारधारेची पार्टी राहिली नाही, आता भाजपामध्ये अटलजी आणि आडवाणीजींचे सर्वसमावेशक विचार चालत नाही तर पंतप्रधान मोदींचीच हुकूमशाही चालते. लहान कार्यकर्त्यांच्या समस्या ऐकल्या जात नाहीत, म्हणून मी बीआरएस पक्षाशीच एकनिष्ठ राहायचे, असे ठरवले. आता तर पंतप्रधान मोदी घरी आले तरी भाजपामध्ये जाणार नाही, असे बीआरएसचे विभागीय समन्वयक व तुमसरचे माजी आमदार चरण वाघमारे म्हणाले.
वाघमारे गोंदिया येथे बीआरएसच्या संगठनात्मक बांधणीचा आढावा घेण्यासाठी आले असता शासकीय विश्रामगृहात पत्रपरिषदेत बोलत होते. वाघमारे म्हणाले, महाराष्ट्रात पुढील काळात पक्षातर्फे तेलंगणाप्रमाणे शेतकरी व इतर समाजबांधवांकरिता संघर्ष केला जाईल. महाराष्ट्रात पक्षातर्फे विधानसभेच्या २८८ जागा व लोकसभेच्या ४८ जागा स्वःबळावर लढवण्यात येईल. यासाठी सदस्य नोंदणी व संघटनात्मक बांधणीवर जोर दिला जात आहे. प्रत्येक विधानसभा निहाय २५ हजार सदस्य नोंदणीचे लक्ष्य ठेवले आहे. या महिन्यात किंवा पुढील महिन्यात तेलंगानाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा महाराष्ट्रात दौरा आहे. त्यादरम्यान त्यांचे रोड शो आणि जाहीर सभा, कार्यकर्ता मेळावे, आदी कार्यक्रमांची आखणी केली आहे.
हेही वाचा – नागपूर आणि वर्धा या दोन जिल्ह्यांत १७ महिन्यांत १० हजार कृषीपंपांना वीज जोडणी
पत्रपरिषदेला गोंदिया जिल्हा सहसमन्वयक माजी जि.प. सदस्य राजेश चांदेवार, अर्जुनी मोरगाव विधानसभा समन्वयक रमेश चिल्लारे, तिरोडा विधानसभा समन्वयक बबलू बैस, आमगावचे ब्रजभूषण बैस, वसीम उपस्थित होते.