अकोला : प्रदेश कार्यकारिणी जाहीर होताच राज्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला. अकोल्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी प्रदेश सरचिटणीस डॉ. अभय पाटील यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा गुरुवारी राजीनामा दिला. आपल्या समाजमाध्यम खात्यावरून त्यांनी हे जाहीर केले. नव्या कार्यकारिणीमध्ये डावलण्यात आल्याने त्यांनी राजीनामास्त्र उगारल्याची चर्चा आहे. डॉ. पाटील यांनी काँग्रेसकडून अकोल्यातून लोकसभा निवडणूक लढत भाजपला काट्याची टक्कर दिली होती. डॉ. पाटील यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात फेरबदल केले जात आहेत. प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा बुलढाण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे सोपवल्यानंतर प्रदेश कार्यकारिणीची प्रतीक्षा होती. अखेर मंगळवारी रात्री उशीरा काँग्रेसने प्रदेश कार्यकारिणीवर शिक्कामोर्तब करून ती घोषित केली. यामध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली असून काही जुन्या पदाधिकाऱ्यांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी काँग्रेस अंतर्गत नाराजीचा सूर उमटला. प्रदेश कार्यकारणी जाहीर होताच अकोल्यातून काँग्रेसला एक मोठा धक्का बसला.

काँग्रेसचे माजी प्रदेश सरचिटणीस डॉ. अभय पाटील यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. नाना पटोले यांच्या कार्यकारिणीमध्ये त्यांना मानाचे प्रदेश सरचिटणीस पद देण्यात आले होते. मात्र, नुकत्याच जाहीर झालेल्या काँग्रेसच्या नव्या कार्यकारिणीमध्ये त्यांना स्थान मिळाले नाही. आपल्याला डावल्याची भावना निर्माण झाल्याने त्यांनी तडकाफडकी पक्षाचा राजीनामा दिल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या भूमिके मागील नेमके कारण त्यांनी अद्याप स्पष्ट केलेले नाही. डॉ. पाटील यांच्या आगामी भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष राहील.

लोकसभेत भाजपाला दिली होती तुल्यबळ लढत

काँग्रेसकडून लोकसभा लढण्यासाठी २०१९ मध्येच डॉ. अभय पाटील यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी काही कारणाने संधी गेली तरी डॉ. पाटील यांनी पाच वर्ष तयारी सुरू ठेवली. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ॲड. आंबेडकरांसोबत आघाडी न झाल्याने अपेक्षेप्रमाणे डॉ. पाटील यांना काँग्रेसने उमेदवारी दिली. १९८९ पासून २०१९ पर्यंत २२ ते ३० टक्क्यांच्या दरम्यान मिळणारी काँग्रेसची मते २०२४ मध्ये प्रथमच ३५.४९ टक्क्यांवर पोहोचली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अकोला मतदारसंघ राखताना भाजपला चांगलीच कसरत करावी लागली. या निवडणुकीमध्ये भाजपचे अनुप धोत्रे यांना चार लाख ५७ हजार ०३०, काँग्रेसचे डॉ. अभय पाटील यांना चार लाख १६ हजार ४०४ व ॲड. प्रकाश आंबेडकर यांना दोन लाख ७६ हजार ७४७ मतांवर समाधान मानावे लागले. ४० हजार ६२६ मतांनी अनुप धोत्रे यांनी डॉ. अभय पाटील यांचा पराभव केला. डॉ. अभय पाटील यांनी दिलेल्या तुल्यबळ लढतीमुळे पराभवानंतरही काँग्रेसला अकोल्यात नवी उभारी मिळाली होती.