दिव्यशक्ती अंगी असल्याचा भ्रम निर्माण करणाऱ्या आणि चमत्काराच्या नावावर जनतेची लुबाडणूक करणाऱ्या धीरेंद्र कृष्ण महाराज यांच्यावर जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची हिंमत पोलीस का दाखवत नाहीत, असा सवाल अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक व राष्ट्रीय संघटक प्रा. श्याम मानव यांनी केला.
हेही वाचा- प्राथमिक चौकशीमध्ये डॉ. धवनकर दोषी
प्रा. श्याम मानव यांनी सोमवारी लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी ते म्हणाले, बागेश्वर धाम येथील धीरेंद्र कृष्ण महाराज यांनी रामकथेच्या नावावर नागपुरात दिव्य दरबार आणि प्रेत दरबार भरवून लोकांची कशी फसवणूक केली त्याची चित्रफीत उपलब्ध आहे. याबाबत पोलीस आयुक्त अमितेशकुमार आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) यांच्याकडे याबाबत आपण तक्रार दिली आहे. आता त्यांनी देव-धर्माच्या नावावर भूत, प्रेत, बुवाबाजी करून जनतेची लूट करणाऱ्या महाराजावर गुन्हा दाखल करावा. जादूटोणा विरोधी कायद्यानुसार दक्ष अधिकारी म्हणून सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) यांना स्वत:हून महाराजांविरुद्ध कारवाईचे अधिकार आहेत. परंतु ते धाडस करीत नाहीत. म्हणून मी जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती, प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी या शासकीय समितीचा सहअध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे तक्रार केली आहे. लोकांना चमत्कार दाखवतानाची चित्रफीत पुरावा म्हणून उपलब्ध आहे. रेशीमबाग मैदानावर ७ आणि ८ जानेवारीला दिव्य दरबार आणि प्रेत दरबार आयोजित करण्यात आले होते. करणी करणे, भूत लावणे अशा गोष्टी सांगून लोकांमध्ये भीती निर्माण करणे, शारीरिक आजार बरे करण्याचा दावा करणे, चत्मकार करणे आणि त्यातून पैसा कमवणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे. जादूटोणा विरोधी कायद्यात हे प्रकरण तंतोतंत बसणारे आहे. त्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल करून महाराज यांच्यावर कारवाईचे धाडस दाखवावे. नाहीतर कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. केवळ गुन्हे करणेच नव्हेतर जादूटोणा विरोधी कायद्यानुसार आपल्या अधिकार क्षेत्रात घडू पाहणाऱ्या गुन्ह्याला प्रतिबंधित करण्याची जबाबदारी कायद्याने दक्षता अधिकार म्हणून सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) यांच्यावर सोपवली आहे. ही तरदूत कायद्यात कलम ५(२) एक, दोन मध्ये आहे.
हेही वाचा- नागपूर शिक्षक मतदारसंघात बहुरंगी लढत; २२ उमेदवार रिंगणात, पाच उमेदवारांचे अर्ज मागे
या महाराजांचे दिव्य दरबार युट्यूबवर लोक पाहत आहेत. त्यामध्ये केलेल्या दिव्य शक्तीच्या दाव्याने, प्रयोगाने प्रभावित होऊन मोठ्या संख्येने लोक धीरेंद्र महाराज यांच्या नादी लागत आहेत. याद्वारे देखील सामान्य जनतेची फसवणूक होत आहे, असेही प्रा. श्याम मानव म्हणाले.
हेही वाचा- विश्लेषण: ‘अंनिस’ने नागपूरमध्ये आक्षेप घेतलेले धीरेंद्र कृष्ण महाराज आहेत कोण? हा वाद काय?
फडणवीसांनी स्वत: पुढाकार घ्यावा
महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षाच्या संमतीने २०१३ मध्ये जादूटोणा विरोधी कायदा झाला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना या कायद्याबाबत सर्व प्रमुख पोलीस अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण देखील झाले आहे. आता या कायद्याच्या अंमलबजावणीची वेळ आली आहे. हिंदू देव-देवता आणि धर्माच्या नावावर कोणी बाबा, महाराज हिंदूंची फसवणूक करीत असेल तर ते कोणताच राजकीय पुढारी खपवून घेणार नाही. आता तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत:च गृहमंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांनी या कायद्याच्या कडक अंमलबजावणीसाठी पुढाकार घेतला पाहिजे. नाहीतर समाजात चुकीचा संदेश जाईल, असेही प्रा. श्याम मानव म्हणाले.