सोनेगावातील इंद्रप्रस्थ लेआऊटमध्ये माजी सैनिक सुरेश पोटदुखे यांचे हातपाय बांधून जीवे मारण्याचा प्रयत्न करीत ३२ लाख रुपयांचा मुद्देमाल लुटल्याच्या घटनेचा सूत्रधार चक्क त्यांचा चालकच निघाला. या प्रकरणाचा गुन्हे शाखेने छडा लावला असून चौघांना अटक केली. त्यांना न्यायालयाने १५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.विनायक दौलतराव मुंदाफळे (५४, रा. सर्वश्रीनगर दिघोरी), विनोद सोनटक्के (४८, रा. दसरा रोड महाल), नाइजर रोनाल्ड उर्फ सॅनिटाइजर (रा. जाटतरोडी, इमामवाडा) आणि शुभम उर्फ अप्या प्रकाश मानके (२७, रा. रामबाग), अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत, तर आरोपी पवन आणि ऋषी हे दोघे अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

हेही वाचा >>>अकोला: भक्तीत तल्लीन भाविकांवर काळ बनून वादळ कोसळले; सभामंडपावर वृक्ष पडून सात जणांचा मृत्यू, २६ जखमी

सुरेश पोटदुखे हे माजी सैनिक असून त्यांचे चंद्रपुरात लग्नसभागृह आहे. ते नागपुरात एकटेच राहतात. त्यांचा मुलगा अमेरिकेत स्थायी झाला असून मुलींचे लग्न झाले आहेत. त्यांच्याकडे विनायक मुंदाफळे हा चालक म्हणून नोकरीला होता. मंगळवारी सुरेश पोटदुखे घरात झोपले होते. रात्री एक वाजताच्या सुमारास तीन आरोपी घरात घुसले. त्यांनी सुरेश यांचे हातपाय बांधले आणि चाकू दाखवून तिजोरीची किल्ली मागितली. सुरेश यांनी नकार देताच त्यांच्या पाठीत एका दरोडेखोराने चाकू भोसकला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांनी तिजोरीची किल्ली दिली. दरोडेखोरांनी १५० ग्राम सोन्याचे दागिने आणि २५ लाख रुपये रोख, असा एकूण ३२ लाखांचा मुद्देमाल पळवून नेला. गुन्हे शाखेचे उपायुक्त मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनात युनीट तीनचे प्रमुख ज्ञानेश्वर भेदोडकर यांच्या पथकाने चारही आरोपींना अटक केली. सुरेश यांची कुणीतरी टीप दिल्याचा संशय भेदोडकर यांना होता. त्या दिशेने तपास करीत गुन्हे शाखेने त्यांच्या चालकासह चौघांच्या मुसक्या आवळल्या.