लोकसत्ता टीम

बुलढाणा : जिल्ह्यासाठी मंगळवार घातवार ठरला. यामुळे जिल्हा हादरलाय. दोन वेगवेगळ्या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला. चिखली तालुक्यातील चिखली- जाफ्राबाद मार्गावर मंगळवारी दुपारी भीषण अपघात झाला. भरधाव दुचाकीचे नियंत्रण सुटल्याने ती रस्त्या लगताच्या झाडावर आदळली. यात दुचाकी वरील तीन युवकांचा जागीच मृत्यू झाला. पळसखेड दौलत गावाच्या समोर असलेल्या भोकरवाडीजवळ हा अपघात झाला.

घटनेची माहिती मिळताच चिखली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ठार झालेले तिघेही तरुण मराठावाड्यातील सिल्लोड ( जिल्हा छत्रपती संभाजी नगर ) तालुक्यातील पिंपरी येथील रहिवासी आहेत. रोहित महादू चाबूकस्वार (वय २४ वर्षे ), शुभम रमेश चाबूकस्वार (वय २५ वर्षे ) , सोनू सुपडू उसरे (वय २३वर्षे ) अशी अपघातात ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत.हे तिघे युवक (एम एच १५, ०७५७ क्रमांकाच्या) पल्सर वाहनाने कुंभारी येथे जात होते अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. घटनेचा विस्तृत तपशील ईथे मिळाला नाही. हे वृत्त लिहीपर्यंत पोलीस कारवाई सुरु होती.

भरधाव वाहनाने शेतकऱ्याला चिरडले!

बुलढाणा तालुक्यात झालेल्या वाहन अपघातात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला.तांदूळवाडीतील वाणी मळ्याजवळ आज मंगळवारी, २५ मार्च रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धाड मार्गावरील तांदूळवाडीत आज, रस्ता ओलांडणाऱ्या शेतकऱ्याला भरधाव वाहनाने चिरडले. या अपघातात शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. बळीराम पांडुरंग वाणी (५६, राहणार तांदुळवाडी तालुका बुलढाणा ) असे मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. भरधाव कारने त्यांना धडक दिली. त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आला आहे. बळीराम वाणी यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. या घटनेमुळे परिसरात दुख्खाचे सावट पसरले आहे.