नागपूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीच्यावतीने अनेक दिवसांपासून कुठल्याही परीक्षेसाठी जाहिरात देण्यात आलेली नाही. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी चातकासारखे जाहिरातीची वाट बघत होते. त्यामुळे एमपीएससीने अनेक दिवसांनंतर एका विभागाची पदभरती जाहीर केली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आता अर्ज करता येणार आहे. दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने गट क पदाच्या १३७ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
यासाठी उमेदवारांना ३० जूनपर्यंत अर्ज करता येणार आहे. अनेक वर्षांपासून विद्यार्थी या जाहिरातीची वाट बघत होते. मात्र, राज्य सरकारकडून मागणीपत्र दिल्यावरही आयोगाकडून जाहिरात प्रसिद्ध झालेली नव्हती. अखेर आयोगाने जाहिरात प्रसिद्ध केल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी अर्ज करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेष म्हणजे या पदासाठी मुंबईच्या परीक्षा केंद्रावर ऑनलाईन माध्यमातून परीक्षा होणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या अधिनस्त केवळ राज्य उत्पादन शुल्क विभागातील लिपिक संवर्ग व जवान संवगांतील खालील पदावरील कर्मचारी प्रस्तुत परीक्षेस पात्र असतील :-लिपिक संवर्ग : लिपिक, वरिष्ठ लिपिक, लिपिक-टंकलेखक, टंकलेखक, लेखापाल व टिप्पणी सहायक
जवान संवर्ग: जवान, जवान-नि-वाहनचालक, पेटी आफिसर, सहायक दुय्यम निरीक्षक
शैक्षणिक अर्हतेसह सेवाः शासन परिपत्रक/जाहिरातीमध्ये नमूद अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकास (दिनांक ३० जून, २०२५ रोजी) लिपिक संवर्गामध्ये किंवा जवान संवर्गामध्ये नियमित नियुक्तीच्या दिनांकापासून खालीलप्रमाणे किमान नियमित सेवा पूर्ण होणे आवश्यक आहे: मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेचा पदवीधर असलेल्या उमेदवारांच्या बाबतीत ३ वर्षे नियमित सेवा. महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची एच.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण किंवा महाराष्ट्र शासनाने एच.एस.सी. च्या समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता, अशा उमेदवारांच्या बाबतीत ५ वर्षे नियमित सेवा.
महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची एस.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण किंवा महाराष्ट्र शासनाने एस.एस.सी.च्या समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता, अशा उमेदवारांच्या बाबतीत ७ वर्षे नियमित सेवा. लिपिकवर्गीय कर्मचा-यांसाठी असलेली सेवाप्रवेशोत्तर प्रशिक्षण परीक्षा/विभागीय परीक्षा उत्तीर्ण न झालेले अथवा सदर परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट दिलेली नाही, असे कर्मचारी प्रस्तुत परीक्षेस अर्ज सादर करण्यास पात्र नाहीत. जवान संवर्गीय कर्मचाऱ्यांसाठी अशी परीक्षा नसल्यामुळे ते परीक्षेस बसण्यास पात्र असतील.