वर्धा : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शासनाने महापुरुषांशी संबंधित दहा ऐतिहासिक गावांतील शाळा विकसित करण्याची घोषणा २०२२-२३ च्या अर्थसंकल्प अधिवेशनात केली होती. त्यात काही आमदारांच्या मागणीनुसार पुन्हा तीन गावांची भर पडली. केंद्र शासनाकडून अमृत महोत्सव उपक्रमाअंतर्गत आता निधी मंजूर झाला आहे. राज्याच्या सांस्कृतिक मंत्र्यांच्या अध्यक्षतेतील समितीने त्यास मान्यता प्रदान केली आहे.

१४ कोटी ३० लक्ष २० हजार रुपयांच्या प्रस्तावास मान्यता मिळाली आहे. या निधीतून ऐतिहासिक वारसा असलेल्या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळा विकसित केल्या जातील.

हेही वाचा – पाणीपुरी मृत्यू प्रकरणात आता ‘एफडीए’ला जाग… मेडिकलला दिलेल्या पत्रात काय?

महापुरुषांचा वारसा लाभलेली गावे अशी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चोंढी जि. अहमदनगर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मोझरी जि. अमरावती, संत गाडगेबाबा शेडगाव जि. अमरावती, कृषिरत्न डॉ. पंजाबराव देशमुख पापळ जि. अमरावती, राजर्षी शाहू महाराज कागल जि. कोल्हापूर, वि. वा. शिरवाडकर पिंपळगाव जि. नाशिक, महात्मा ज्योतिबा फुले खानवडी जि. पुणे, महर्षी धोंडो केशव कर्वे मुरुड जि. रत्नागिरी, साने गुरुजी पालगड जि. रत्नागिरी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वाटेगाव जि. सांगली, क्रांतिसिंह नाना पाटील येडे मच्छिंद्र जि. सांगली, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सातारा व सावित्रीबाई फुले नायगाव जि. सातारा.