वर्धा, शहराचा प्रथम नागरिक ठरविणाऱ्या पालिका निवडणुकीचा पहिला टप्पा आटोपला आहे. त्यात अर्ज वैध – अवैध निश्चित झाले. त्यातील प्रमुख पक्षांचे उमेदवार परिचित कुटुंबातील आहे. मात्र बहुसंख्य ठिकाणी महिला उमेदवार असल्याने त्यांची माहिती जाणून घेण्याची उत्सुकता मतदार असलेल्या नागरिकांत दिसून येत आहे. शहराचे प्रमुख पदासाठी निवडणूक लढविणारे हे उमेदवार शिकले की नाही, ते करतात काय, त्यांची पार्श्वभूमी काय, असे प्रश्न पुढे येत आहे. त्याच अनुषंगाने लोकसत्ताने टिपलेले हे निरीक्षण आहे.

जिल्हा मुख्यालय असलेल्या वर्धा शहराचा भावी नगराध्यक्ष कोण ठरणार, ही सर्वात चर्चित बाब झाली आहे. भाजपतर्फे नीलेश प्रकाश किटे यांना उमेदवारी मिळाली आहे. ते पदवीधर असून शेती व अन्य व्यवसायातून त्यांना आर्थिक लाभ मिळतो. काँग्रेसचे सुधीर भाऊराव पांगुळ हे पदवीधर आहेत. गतवेळी ते अपक्ष उभे होते. पण चांगली प्रतिमा म्हणून त्यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते खेचली होती. हॉटेल व्यवसायातून ते उदरनिर्वाह करतात. सेना शिंदे पक्षातर्फे उभे रविकांत बालपांडे हे शिवसेनेचे सर्वात जुने व परिचित नेते आहेत. ते पदवीधर व लेआऊट व्यवसाय करतात. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे संतोष ठाकूर हे माजी नगराध्यक्ष राहले आहेत. त्यांचे शिक्षण शारीरिक शिक्षणशास्त्रात पदव्युत्तर  असे आहे.

आर्वीत भाजपतर्फे स्वाती प्रकाश गुल्हाने उभ्या असून त्या बारावी उत्तीर्ण व गृहिणी आहेत. त्यांचे पती माजी नगरसेवक असून किराणा दुकान चालवितात. आर्वीत काँग्रेस उमेदवार अंजली बाळा जगताप या एम कॉम शिक्षित असून गृहिणी आहेत. त्यांच्या उमेदवारीबाबत पक्षातीलच अन्य नेत्यांनी आक्षेप घेतल्याने वाद सुरूच आहे.

पुलगाव येथील भाजप उमेदवार  ममता नितीन बडगे या बारावी उत्तीर्ण व गृहिणी आहेत. तसेच त्या माजी पालिका सभापती राहल्यात. तर काँग्रेसच्या कविता सुनील ब्राम्हणकर या पण बारावी उत्तीर्ण व गृहिणी आहेत. देवळी नगराध्यक्ष पदासाठी दोन माजी नगराध्यक्ष पुन्हा लढत देत आहेत. भाजपतर्फे माजी खासदार व जिल्हा निवडणूक प्रमुख रामदास तडस यांच्या पत्नी शोभाताई तडस रिंगणात आहेत. त्या दहावी उत्तीर्ण असून क्राफ्ट टीचर असा परिचय त्यांनी दिला आहे.

मात्र तडस खासदार असतांना शोभा तडस यांनी सांभाळलेले प्रचार सूत्र लोकांच्या चांगल्याच परिचयाचे असल्याने त्या प्रभावी उमेदवार ठरल्या आहेत. तर काँग्रेसतर्फे माजी नगराध्यक्ष सुरेश वैद्य यांना उमेदवारी मिळाली आहे. ते शेतकरी असून सामाजिक सेवेत वेळ देतात. सिंदी रेल्वे पालिका अध्यक्षपदासाठी भाजपने राणी कलोडे यांना उमेदवारी दिली. त्या पदवीधर असून हार्डवेअर व्यवसाय करतात. तर काँग्रेसतर्फे माजी नगराध्यक्ष प्रकाशचंद्र डफ यांच्या पत्नी वनिता डफ उमेदवार आहेत. त्या एमए, एलएलबी अश्या पदव्या मिळवून आहेत.

सर्वाधिक चर्चेत असलेल्या हिंगणघाट पालिकेत आजच तिहेरी लढत दिसून येत आहे. येथे उभाठा पक्षाच्या नीता सतीश धोबे या पदवीधर असून गृहिणीपद सांभाळतात.वैद्यकीय महाविद्यालय आंदोलनात त्या अग्रेसर होत्या.त्या पूर्वी नगरसेवक राहल्या आहेत. तर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शुभांगी सुनील डोंगरे उमेदवार आहेत. त्या गृहिणी असून पूर्वी नगरसेवक राहल्यात. त्यांचे शिक्षण एमएससी,  बिएड असे आहे. तर भाजप उमेदवार डॉ. नयना उमेश तुळसकर या प्राचार्यपद भूषवितात.

अमरावती विद्यापीठातुन त्या बॉटनी विषयात एम एससीत गुणवत्ता यादीत झळकल्या होत्या. नॅक व अन्य समितीवर त्यांनी कार्य केले आहे. पीएचडी पदवी प्राप्त करतांनाच त्यांनी राष्ट्रीय जर्नलमध्ये शोधप्रबंध लिहलेत. विद्या विकास संस्थेच्या समुद्रपूर येथील महाविद्यालयाच्या त्या प्राचार्य आहेत. म्हणून त्या सर्वाधिक शिक्षित उमेदवार म्हणून चर्चेत आल्या आहेत.