अमरावती : इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी राज्यभरात बुधवारी २१ मेपासून प्रत्यक्ष नोंदणी व पसंतिक्रम नोंदविणे प्रक्रिया सकाळी ११ वाजता सुरु होणार होती. मात्र, अद्याप तांत्रिक दुरूस्तीचे काम सुरु असल्याने प्रक्रिया सुरु झालेली नाही. नोंदणीसाठी विद्यार्थी, पालक ताटकळले आहेत. तर प्रक्रिया करण्यासाठी शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांतील नेमण्यात आलेले शिक्षकही गोंधळात पडले आहेत.
अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये एकूण १ हजार ४२२ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये कला, वाणिज्य, विज्ञान या तीन शाखांसाठी एकूण प्रवेश क्षमता १ लाख ८६ हजार ४७५ इतकी आहे.
अकोला जिल्ह्यात २६० कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये कला शाखेत १३ हजार ९१५, वाणिज्य शाखेत ५ हजार २९५ आणि विज्ञान शाखेत १७ हजार ८०५, अशी एकूण ३७ हजार १५ प्रवेश क्षमता आहे.
अमरावती जिल्ह्यातील ३१० कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये कला शाखेत १८ हजार ६०, वाणिज्य शाखेत ५ हजार ८६० आणि विज्ञान शाखेत १७ हजार २६०, अशी एकूण ४१ हजार १८० प्रवेश क्षमता आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील ३४० कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये कला शाखेत १८ हजार ३७०, वाणिज्य शाखेत ६ हजार २२० आणि विज्ञान शाखेत २० हजार ५६० अशी एकूण ४५ हजार १५० इतकी प्रवेश क्षमता आहे.
वाशीम जिल्ह्यातील १९५ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये कला शाखेत १० हजार २७०, वाणिज्य शाखेत २ हजार २० आणि विज्ञान शाखेत १० हजार ९९० अशी एकूण २३ हजार २८० इतकी प्रवेश क्षमता आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील ३१७ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये कला शाखेत २० हजार १२५, वाणिज्य शाखेत ४ हजार ९४५ आणि विज्ञान शाखेत १४ हजार ७८० अशी एकूण ३९ हजार ८५० इतकी प्रवेश क्षमता आहे.
प्रवेश प्रक्रियेत अडथळा
शिक्षण विभागाने २०२५-२६ शैक्षणिक वर्षातील प्रवेशासाठी स्वतंत्र संकेतस्थळाची निर्मिती केली आहे. २१ मेपासून २८ मेपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी प्रत्यक्ष नोंदणी करता येणार आहे. परंतु, पहिल्याच दिवशी बुधवारी सकाळी ११ वाजता सुरु होणारी प्रक्रिया काहीवेळ लांबली. संकेतस्थळाचे काम सुरु असून लवकरच सुरु होईल, असा संदेश येत असल्याचेही काही पालक, शिक्षकांनी सांगितले.
संपूर्ण अमरावती विभागात कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेची एकूण प्रवेश क्षमता ही १ लाख ८६ हजार ४७५ असून इंग्रजी, मराठी, हिंदी आणि उर्दू माध्यमांची सुविधा देखील उपलब्ध आहे. अरविंद मंगळे, प्रवेश प्रक्रिया समन्वयक.