गडचिरोली : ‘अबकी बार ४०० पार’ या नाऱ्यासह लोकसभेचे रणशिंग फुंकणाऱ्या भारतीय जनता पक्षाकडून काही जागांवर उमेदवार बदलाचे प्रयोग करण्यात येणार असल्याचे संकेत आहे. त्यात गडचिरोली-चिमूर क्षेत्राचेही नाव पुढे येत असून भाजपचे विद्यमान खासदार अशोक नेतेंऐवजी महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना संधी मिळणार अशी चर्चा आहे. मात्र, आता यात संघपरिवाराकडून डॉ. मिलिंद नरोटे यांचे नाव समोर करण्यात आल्याने नवा पेच निर्माण झाल्याचे चित्र आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात महायुती आणि महविकास आघाडीत जागा वाटपाचा तिढा कायम आहे. तो सोडवण्यासाठी मागील आठवडाभरापासून सर्वच राजकीय पक्षांच्या बैठका सुरू आहे. महायुतीच्या यादीवर शिक्कामोर्तब करण्यासाठी देशाचे गृहमंत्री अमित शाहा राज्यात आले होते. भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर ते निघून गेले. मात्र, जागा वाटपाचा तिढा कायम असल्याने तीनही पक्षातील इच्छुकांमध्ये अस्वस्थता शिगेला पोहोचली आहे. भाजपच्या ताब्यातील काही जागांवर घटक पक्षांनी दावा केल्याने महायुतीत तणावाचे वातावरण आहे. काल मुंबईत झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून गडचिरोली-चिमूर जागेसाठी पुन्हा दावा करण्यात आला. त्यात संघापरिवाराकडून आता डॉ. मिलिंद नरोटे यांचे नाव पुढे करण्यात आल्याने पेच वाढला आहे.

हेही वाचा – तीन दिवसा आधीच होणार बँक कर्मचारी वेतनवाढीचा करार, काय आहे कारण?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन दिवसांपूर्वी लोकसभेचा आढावा घेण्यासाठी आलेल्या भाजपच्या निरीक्षकांपुढे जिल्ह्यातील अनेकांनी डॉ. नरोटे यांचे नाव सुचवले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेले डॉ. नरोटे मागील अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. भाजपामधील एक गट त्यांच्या समर्थनात आहे. अशात नवा चेहरा द्यायचा असेल तर डॉ. नरोटे यांना संधी द्यावी, असा आग्रह संघपरिवाराकडून करण्यात आल्याचे समजते. महत्त्वाचे म्हणजे डॉ. नरोटे यांना कामाला लागा अशा सूचनाही करण्यात आल्या आहे. त्यामुळे विद्यमान खासदार अशोक नेते यांच्यापुढे मंत्री आत्राम पाठोपाठ दुसरे आव्हान निर्माण झाले आहे. येत्या दोन दिवसात जागावाटपाचा तिढा सुटणार असे चित्र असताना गडचिरोली – चिमूरच्या संदर्भात भाजप धक्कातंत्राचा वापर करू शकतो.

हेही वाचा – संस्कृत ही २०४७पर्यंत पहिल्या पसंतीची भाषा व्हावी!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महविकासआघाडीत शांतता

गडचिरोली – चिमूरसाठी महायुतीत अस्वस्थता दिसून येत असताना महविकास आघाडीत मात्र शांतता असल्याचे चित्र आहे. या जागेवर काँग्रेसचे वर्चस्व असल्याने त्यांच्याच उमेदवाराला संधी मिळणार हे जवपास निश्चित आहे. त्यामुळे काँग्रेसकडून डॉ. नामदेव किरसान आणि डॉ. नामदेव उसेंडी ही दोन नावे चर्चेत आहेत. डॉ. उसेंडी यापूर्वी दोनदा पराभूत झाल्याने त्यांना तिसऱ्यांदा संधी देण्यावर साशंकता उपस्थित केल्या जात असल्याने डॉ. किरसान यांचे नाव आघाडीवर आहे.