गडचिरोली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोलीचे पालकत्व स्वीकारल्यानंतर सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याऐवजी विकासाच्या थापा मारतात, असा आरोप काँग्रेसने केला आहे.त्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवस ‘लॉलीपॉप आणि चॉकलेट’ वाटून साजरा करणार, असे गडचिरोली काँग्रेसकडून जाहीर करण्यात आले आहे. काँग्रेसच्या या उपाहासात्मक आंदोलनाची सध्या जिल्ह्यात जोरदार चर्चा आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीला क्रमांक एकचा जिल्हा बनवणार अशी घोषणा करून पालकत्व स्वतःकडे ठेवले. मात्र, त्यांना जिल्ह्यातील सामान्य नागरिकांसाठी वेळ नाही. आज पर्यंत त्यांनी केलेल्या दौऱ्यांमध्ये येथील नागरिक, लोकप्रतिनिधी, राजकीय नेते यांच्याशी संवाद साधलेला नाही.
मागील काही वर्षांपासून जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात अनेकांना जीव गमवावा लागला. वारंवार उद्भवणाऱ्या पूरस्थितीमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. डिमांड भरूनही शेतकऱ्यांना मीटर उपलब्ध करून देण्यात येत नाही. कर्जमाफी आणि बोनससाठी त्यांना मोठी प्रतीक्षा करावी लागते. घरकुलाचे हप्ते थकले आहेत. रोजगाराच्या नावाखाली युवकांची फसवणूक होत आहे. उद्योगांसाठी जमिनीचे बळजबरी अधिग्रहण करण्यात येत आहे.
वृक्षतोडीचा विरोध केल्यास प्रशासनाकडून दडपशाही करण्यात येते. रस्त्यांची अत्यंत वाईट अवस्था झालेली आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. लोहखनिजाच्या बेदरकार वाहतुकीमुळे सामान्य नागरिकांचा बळी जात आहे. एसटी उपलब्ध नसल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो आहे. एवढे गंभीर प्रश्न असताना सुद्धा पालकमंत्री याकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे आम्ही या सर्व पीडित नागरिकांना मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशी लॉलीपॉप आणि चॉकलेट वाटप करणार असल्याचे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी प्रसिद्धी पत्रकातून जाहीर केले आहे.
२२ ला मुख्यमंत्री जिल्ह्यात
२२ जुलै रोजी मुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करणार आहेत. सोबतच हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र” या अभियानांतर्गत गडचिरोली जिल्ह्यासाठी राज्य शासनाने एक कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट दिले असून, या उपक्रमाचा शुभारंभ फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. यानिमित्ताने जिल्ह्यात ‘वृक्ष लागवड पंधरवडा’ सुरू करण्यात येत असून, पहिल्या टप्प्यात ४० लाख वृक्ष लागवडीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. यासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी शुक्रवारला अधिकाऱ्यांची बैठक घेतली.