गडचिरोली : जिल्ह्यातील जवळपास सर्वच ग्रामीण रुग्णालयांची विदारक अवस्था असताना जिल्हा सामान्य रुग्णालयसुद्धा अस्वच्छता आणि गैरसोयीमुळे आजारी पडल्याचे चित्र आहे. रुग्णालयात एकीकडे प्रवेश केल्यावर पंचतारांकित अतिदक्षता विभाग आहे. तर इतर खोल्यात कोंडवाडासारखी परिस्थिती असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांकडून रोष व्यक्त करण्यात येत आहे.

दुर्गम आणि नक्षलग्रस्त जिल्हा अशी ओळख असलेल्या गडचिरोलीचा अकांक्षित जिल्ह्यात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे विकासकामांना गती येईल असा दावा पालकमंत्र्यांसह सत्ताधारी नेत्यांनी वारंवार केला आहे. परंतु जिल्ह्याची आरोग्य यंत्रणाच अद्याप आजारी असल्याने गरीब रुग्णांनी कुठे जायचे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. वर्षभरापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथील पंचतारांकित अतिदक्षता विभागाचे उद्घाटन केले होते. यात अधिकाऱ्यांचे कक्षही चकाचक करण्यात आले. मात्र, उर्वरित वार्डांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आले. परिणामी या वार्डातील परिस्थिती आता दयनीय झाली असून स्वच्छ्ता गृहात सर्वत्र दुर्गंधी व घाण पसरली आहे. छतातून रुग्णांच्या बेडवर पाणी गळत आहे. अशा स्थितीत रुग्णांची प्रचंड हेळसांड होत असल्याचे चित्र आहे. रुग्णांसोबत आलेल्या नातेवाईकांनी याबाबत तक्रार केली असता काही सुरक्षा रक्षकांनी त्यांच्याशी अरेरावी केली. असे पितांबर कुंदलवार यांचे म्हणणे आहे. ते आपल्या आईला भरती करण्यासाठी आले होते. त्यामुळे कोट्यवधींच्या घोटाळ्याच्या आरोपांनी गाजत असलेले जिल्हा रुग्णालय आता रुग्णांच्या तक्रारीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

हेही वाचा – विद्यार्थ्यांनो लक्ष द्या, सीबीएसई परीक्षा पद्धतीत मोठा बदल; दहावी व बारावीचे प्रश्न सक्षमतेवर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा – अमरावतीत तरुणाच्या त्रासाला कंटाळून तरुणीने घेतली रेल्वेसमोर उडी; वडिलांची राजापेठ ठाण्यात तक्रार

मागील काही महिन्यांपासून काही वार्डात दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी गळती होत आहे. स्वच्छता गृहदेखील स्वच्छ करण्याचे कार्य प्रगतीपथावर आहे. परंतु वारंवार पत्रव्यवहार केल्यावरसुद्धा बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांनी सांगितले.