गडचिरोली : कार्यालयीन वेळेत खर्रा खाऊन कर्तव्य बजावणाऱ्या एका लिपिकाला गडचिरोलीचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी गुरुवारी खडेबोल सुनावत एक हजाराचा दंड शासकीय तिजोरीत भरायला लावल्याने प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली. महामार्गाच्या समस्यांबाबत डॉ. नरोटे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालयात भेट दिली असता हा प्रकार घडला.

गेल्या काही काळापासून गडचिरोली जिल्ह्यात व्यसनधीनतेच्या प्रमाणात वाढ झाली आहे. बंदी असतानाही दारू, तंबाखू, खर्रा आदींची राजरोसपणे विक्री नवे नाही. त्यामुळे तरुणपिढी व्यसनांच्या आहारी गेल्याचे दुर्दैवी चित्र आहे. यावर आळा घालण्यासाठी प्रशासनस्तरावर विविध उपाययोजना केल्या जातात. काही कार्यालयामध्ये तर दंडाची देखील तरतूद करण्यात आली आहे. तरीही अनेक सरकारी कार्यालयांमध्ये व्यसन करून कामकाज सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. परिणामी सर्वसामान्यांना या व्यसनाधीन कर्मचाऱ्यांचा दररोज सामना करावा लागतो.

गुरुवारी याचा फटका गडचिरोली विधानसभेचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनाही बसला. राष्ट्रीय महामार्गाच्या प्रश्नासंदर्भात डॉ. नरोटे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या गडचिरोली येथील कार्यालयात गेले असता कुणीही अधिकारी उपस्थित नव्हते. त्यामुळे माहिती घेण्याकरता ते लिपिकाकडे गेले. यावेळी तो खर्रा चघळत बसला होता. यामुळे त्याला बोलणेही जमत नव्हते. या प्रकारामुळे संतापलेल्या आमदारांनी लिपिकाला तात्काळ एक हजाराचा दंड शासकीय कोषात भरायला लावले. त्याची शासकीय पावतीही फाडण्यात आली. या प्रसंगाची प्रशासकीय वर्तुळासह जिल्हाभरात चर्चा जोरदार चर्चा आहे.

अधिकारी, कर्मचाऱ्यांवरील वचक संपला

राज्याचे मुख्यमंत्री गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आहे. त्यामुळे प्रशासकीय कामकाज सुरळीत पार पाडावे यासाठी वरिष्ठ अधिकारी कायम प्रयत्न करत असतात. मात्र, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागातील प्रकारामुळे कनिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कुणाचेही वचक नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. आजही अनेक कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी कार्यालयीन वेळेत दारू पिऊन असतात. तंबाखूचे व्यसन तर सामान्य झाले आहे. यामुळे सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागतो. जिल्हा मुख्यालयीच असा प्रकार घडत असेल तर ग्रामीण भागातील कल्पना न केलेलीच बरी.