गडचिरोली : सप्टेंबर महिन्यात छत्तीसगडमध्ये चकमकीत ठार झालेला जहाल नक्षल नेता सेंट्रल कमिटी सदस्य कट्टा रामचंद्र रेड्डी उर्फ राजू दादा याची पत्नी शांतिप्रिया हिने शरणागती पत्करलेले नेते हेच संघटनेतील गुप्त खबरी असल्याचा आणि त्यांनीच आपल्या पतीला संपवल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. त्यामुळे नक्षलवादी चळवळीचा कणा ओळखल्या जाणारा पॉलिट ब्युरो सदस्य भूपती उर्फ सोनू दादा आणि दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीचा प्रमुख कमांडर रूपेश उर्फ सतीश यांच्यासह शेकडो जहाल नक्षलवाद्यांनी पत्करलेल्या ऐतिहासिक शरणागतीवर आता प्रश्न उपस्थित करण्यात येत असल्याचे चित्र आहे.
गुरुवारी शांतप्रिया आपल्या पतीचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी जगदपूर येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना अप्रत्यक्षपणे भूपतीवर निशाणा साधला. त्या म्हणाल्या, आपल्या पतीची हत्या ही बनावट चकमक होती.
माझ्या पतीला आणि कोसा दादाला २२ सप्टेंबर रोजी जिवंत पकडण्यात आले होते. त्यांचा अमानुष छळ करून नंतर त्यांची हत्या केली गेली. हा सर्व कट संघटनेतील फितुरांनी रचला. नुकतेच शरण आलेले नेतेच यामागे असून, त्यांना स्वतःला शरण येऊन ऐशोआरामात जीवन जगायचे होते, म्हणूनच त्यांनी माझ्या पतीचा बळी दिला. असा आरोप शांतीप्रिया यांनी केला आहे. यावेळी त्यांनी सरकारवरही त्यांनी टीका केली.
सरकार अशा ‘गद्दारांना’ ‘ब्रँड अँबेसेडर’ बनवून मिरवत आहे, पण आम्हाला मात्र न्यायासाठी आणि पतीच्या मृतदेहासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावावे लागले. आमचा न्यायव्यवस्थेवरून विश्वास उडाला आहे,अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. भूपती आणि रुपेशच्या आत्मसर्पणानंतर विशेष करून तेलंगणा आणि आंध्रप्रदेश मध्ये कडव्या डाव्या विचारांच्या समर्थकांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. हे विशेष.
मृतदेहासाठी न्यायालयीन लढा
सप्टेंबरमध्ये कट्टा रामचंद्र रेड्डी याच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी ही ‘बनावट चकमक’ असल्याचा आरोप करत मृतदेह ताब्यात घेण्यासाठी बिलासपूर उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली होती. त्याच दरम्यान वरिष्ठ नेत्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले केले. शांतिप्रिया यांच्या या आरोपांमुळे नक्षलवादी चळवळीतील अंतर्गत गटबाजी, परस्पर अविश्वास आणि नेतृत्वातील संघर्ष पुन्हा एकदा उघड झाला आहे. या आरोपांवर आता शरणागती पत्करलेले भूपती आणि रूपेश काय उत्तर देतात, याकडे यंत्रणेचे लक्ष लागले आहे.
