गडचिरोली : विद्यमान महायुती सरकार सत्तेत येऊन लवकरच वर्षपूर्ती होणार आहे. मात्र, गडचिरोलीतील राष्ट्रीय महामार्ग आणि अंतर्गत रस्त्यांची झालेल्या बिकट अवस्थेमुळे गडचिरोली जिल्ह्यातील बाराही तालुक्यात प्रशासनाविरोधात प्रचंड असंतोष आहे.

त्रस्त नागरिकांनी समाज माध्यमावर मुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘हेच का तुमचे ‘स्टील हब’, असा संतप्त सवाल केला आहे. सोबतच दररोज खड्डेमुक्त रस्त्यांसाठी राजकीय पक्षांकडून आंदोलन सुरु आहे. मागील ५ वर्षपासून हीच परिस्थिती असल्याने यावर लवकर मार्ग न काढल्यास याविरोधात मोठे जनआंदोलन उभे राहण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील अतिदुर्गम दक्षिण भागातील प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या आष्टी ते सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाचे गेल्या सहा वर्षांपासून काम रखडले आहे. त्यामुळे या मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहन चालविणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत गंभीर आजारी रुग्णांना जिल्हा मुख्यालयी नेण्यासाठी जोखीम पत्करावी लागत आहे. सर्वसामान्य प्रवाशांना दररोज नरकयातना सोसण्याशिवाय पार्याय नाही. अंतर्गत रस्त्यांची तर अक्षरशः चाळण झाली आहे. अहेरी शहरातून जाणाऱ्या रस्त्याची तर अत्यंत बिकट अवस्था आहे.

भामरागड तालुक्यात तर अनेक गावांना जोडणाऱ्या वाटेत असलेल्या नाल्यावर पूल नसल्याने आजारी रुग्णांना व नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. सिरोंचा, एटापल्ली आणि मुलचेरा तालुक्यात तर अधिकच विदारक पारिस्थिती आहे. विशेष म्हणजे मागील पाच वर्षांपासून तत्कालीन पालकमंत्री एकनाथ शिंदे, विद्यामान पालकमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः या रस्त्यांसाठी प्रयत्न करीत आहेत. पण घोडे कुठे अडले, हे कुणालाच माहिती नाही. एवढेच नव्हे तर सुरजागड लोहखानीच्या जवळून जाणारा गट्टा मार्गांवरून तर पायदळ चालणे कठीण झाले आहे. कम्युनिस्ट पक्षाकडून वारंवार आंदोलनानंतरही परिस्थिती जैसे थे आहे.

दुसरीकडे चामोर्शी हरणघाट मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने मोठ्या वाहनांना देखील या मार्गावरून जाणे शक्य नाही. हाही मार्ग मागील तीन वर्षापासून लालफितीत अडकला आहे. राष्ट्रीय महामार्गावर देखील मोठमोठ्या भेगा आणि असमतोल अवस्था झाली आहे. धानोरा,आरमोरी,कोरची,कुरखेडा याही तालुक्यात हीच परिस्थिती आहे. याविरोधात काँग्रेस व आझाद समाज पक्षाने रस्तारोको आंदोलन केले होते.

लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेचा सर्वसामान्यांना फटका

पालकमंत्री पद स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्याच दौऱ्यात गडचिरोलीला ‘स्टील हब’ बनवू अशी घोषणा केली. मोठे उद्योग आणि विकास होणार असल्याचे सांगितले. पण प्रत्यक्षात साधे रस्ते सुद्धा बांधण्यात सरकार अपयशी ठरत असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. दुसरीकडे तीनही विधानसभेतील आमदारांना याबद्दल गंभीरता नसल्याने त्यांनाही अधिकारी गंभीरतेने घेतांना दिसून येत नाही. त्यामुळे पिडीत नागरिकांनी यांच्याविरोधातही रोष व्यक्त केला आहे.

प्रशासकीय विभाग उदासीन

गडचिरोली जिल्ह्यातील रस्त्यासंदर्भात अनेकदा विविध बैठकांमध्ये चर्चा झाली आहे. मागील दोन जिल्हा नियोजनाच्या बैठकीत तर पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली होती. पण पारिस्थिती जैसे थे आहे. स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी विविध भागाचा दौरा करून यावर तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवर काहीही फरक पडलेला दिसत नाही. दरवर्षी डागडुजीवर शेकडो कोटी खर्च करतात. पण परिस्थिती सुधारत नाही. कामातील ‘टक्केवारी’ मात्र वाढत असते.