गडचिरोली : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या धामधुमीत गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी येथे एक धक्कादायक प्रकरण घडले असून उमेदवारी नाकारल्यामुळे शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख अर्चना गोंदोळे या कालपासून बेपत्ता झाल्या आहेत. आरमोरी नगरपालिकेसाठी त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. मात्र, इतर पक्षातून आलेल्यांना संधी देण्यात आल्याने त्यांना जबर मानसिक धक्का बसल्याचे त्यांच्या पतीचे म्हणणे आहे.

शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख अर्चना गोंदोळे या अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. त्यामुळे आरमोरी नगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांना नगरसेवक पदाकरिता उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र पक्षांतर्गत राजकारणामुळे त्यांना ऐनवेळेवर उमेदवारी नाकारण्यात आली. इतकेच नव्हे तर त्यांच्या ऐवजी इतर पक्षातून आलेल्या महिलेला उमेदवारी दिली.

त्यामुळे अर्चना दुखावल्या होत्या. इतकी वर्षे समाजकारण आणि राजकारणात सक्रिय राहूनही पक्षाने संधी न दिल्याने त्यांना मानसिक धक्का बसला. याच विवंचनेतून त्या घरातून निघून गेल्या. असे त्यांच्या पतीचे म्हणणे आहे. सदर प्रकरणात त्यांचे पती संतोष गोंदोळे यांनी अद्याप पोलिसात तक्रार दिली नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

पदाधिकारी कारणीभूत

अर्चना यांचे पती संतोष गोंदोळे यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी केलेल्या दाव्यानुसार स्थानिक पदाधिकाऱ्यांनी नगरपालिकेसाठी पैसे घेऊन उमेदवारी वाटप केली. त्यामुळेच अर्चना यांना डावलण्यात आले. गेल्या २० तासापासून अर्चना बेपत्ता असून त्यांच्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास याला जबाबदार शिवसेनेचे पदाधिकारी राहतील, असे संतोष गोंदोळे यांचे म्हणणे आहे.

उमेदवारी वाटपासंदर्भातील निर्णय पक्षाच्या वरिष्ठ स्तरावरून झालेला आहे. यात माझी किंवा स्थानिक पदाधिकाऱ्यांची कुठलीही भूमिका नाही. उलट संबंधित महिला पदाधिकाऱ्याच्या पतीनेच गोंधळ घातला. आम्ही यासंदर्भात पोलिसात कळवले आहे. – सांदीप ठाकूर, जिल्हाप्रमुख शिवसेना शिंदे गट