नागपूर : सोनेगाव परिसरात एका ८२ वर्षीय माजी सैनिक असलेल्या वृद्धाच्या घरात शिरून त्यांना मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे पुन्हा एकदा शहरातील ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत शहरातील विविध भागातील ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या सदस्यांशी संवाद साधण्यात आला असता पोलीस विभागासह महापालिकेने यावर सुरक्षात्मक उपाययोजना करत अधिक लक्ष देण्याची गरज व्यक्त केली. अन्यथा आम्हाला घरात एकटे राहणे कठीण होईल, असेही ज्येष्ठांनी बोलून दाखवले.सिनियर सिटीझन कौन्सिल ऑफ नागपूरचे अध्यक्ष सुरेश रेवतकर म्हणाले, ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न आजचा नाही तर हा पूर्वीपासून आहे. घरात एकटे राहणाऱ्या वृद्धांनी घराजवळ असलेल्या पोलीस ठाण्यात माहिती दिली तर अशा घटना टळू शकतील. ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव होता. मात्र, त्यावर कुठलाही निर्णय घेण्यात आला नाही. पोलीस प्रशासनाने अशा ज्येष्ठ नागरिक असलेल्या त्यातही एकटे असलेल्या ज्येष्ठ नागरिकांकडे लक्ष दिले पाहिजे.
MVA Vajramuth Sabha : ‘ वज्रमुठ’ ला विरोध करण्यावरून भाजपमध्ये मतभिन्नता, शहर अध्यक्ष म्हणतात विरोध नाही
रामनगर ज्येष्ठ नागरिक मंडळाचे प्रमुख नारायण समर्थ म्हणाले, परदेशात ज्यांची मुले राहतात अशा ज्येष्ठ नागरिकांनी पोलीस ठाण्यात सूचना दिली पाहिजे. आजूबाजूच्या लोकांशी संपर्क ठेवला पाहिजे. नागपुरात गुन्हेगारी वाढली आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या सुरक्षेच्या दृष्टीने व्यवस्था केली पाहिजे. शिवाय पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.सुर्वेनगर येथील ज्येष्ठ नागरिक जितेंद्र भोयर म्हणाले, ज्या ज्येष्ठ नागरिकांची मुले बाहेर आहे अशा एकटे राहणाऱ्या वृद्धांच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोरण ठरवले होते. पोलीस विभागाने त्या संदर्भात बैठक घेतल्या होत्या मात्र, त्याकडे विशेष लक्ष देण्यात आले नाही. एकटे असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी पोलीस ठाण्यात जाऊन सूचना देणे आवश्यक आहे.
हेही वाचा >>> नागपूर : बाऊन्सर्सच्या गुंडागर्दीचा ‘व्हिडिओ व्हायरल’; पबमधील युवकाला जबर मारहाण, उपराजधानीत खळबळ
ज्येष्ठांची सुरक्षा केवळ कागदावर न राहात त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. दीनदयालनगर येथील पुष्पा देशमुख म्हणाल्या, ज्येष्ठ नागरिक आज सुरक्षित नाही. ज्येष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेतली पाहिजे. वृद्ध नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना केल्या नाही तर एकट्या माणसाला घरात राहणे कठीण होईल.महाल परिसरातील अनिल पात्रीकर म्हणाले, शहरातील गुन्हेगारी वाढली आहे. प्रत्येक वृद्धांनी सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना केल्या पाहिजे. घराजवळील पोलीस ठाण्यात सांगितले पाहिजे. पण अनेक नागरिक ते करत नाही. बाहेर फिरताना ज्येष्ठ नागरिकांना भिती असते. शासन पातळीवर ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने धोरण निश्चित केले आणि त्या दृष्टीने उपाययोजना केल्या तर ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळेल.