वर्चस्वासाठी तृतीयपंथीयामध्ये टोळीयुद्धाची शक्यता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आर्थिक वाद व गटावरील वर्चस्व कायम राखण्यातून तृतीयपंथीयांमध्ये टोळीयुद्ध भडकले असून कुख्यात उत्तम बाबा याने साथीदारांसह आपलाच शिष्य प्रवीण ऊर्फ चमचम प्रकाश गजभिये (२५) रा. एनआयटी कॉलनी, मानकापूर याच्यावर खुनी हल्ला केला. चमचमच्या डोक्यावर, हातावर गंभीर जखमा झाल्याने त्याची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून उत्तम बाबा तपन सेनापती रा. कामनानगर, चच्चू ऊर्फ कमल उईके (२१) रा. हंसापुरी, किरण अशोक गवळे (३९) रा. हंसापुरी यांना अटक केली आहे. इतर साथीदार फरार आहेत.

ही घटना मंगळवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत कामनानगर परिसरात घडली. शहरात तृतीयपंथीयांचे अनेक गट असून यातील एका गटाचा म्होरक्या उत्तम बाबा आहे. त्याच्या खालोखाल  चमचमचे नाव आहे. या गटात जवळपास ५० तृतीयपंथी असून ते शहरात वेगवेगळ्या भागात राहतात. सकाळी ९ ला उत्तम बाबाच्या घरी जमून चार-चारच्या गटाने वेगवेगळ्या भागात आर्थिक मदत मागायला जायचे. दुपारी १ वाजता उत्तम बाबाच्या घरी जमून जमलेले पैसे उत्तम बाबाकडे जमा करून त्यातून आपला वाटा घेणे हा नेहमीचा परिपाठ.

उत्तम बाबा घरबसल्या प्रत्येक गटाकडून जवळपास दररोज ८ ते १० हजार रुपये घ्यायचा व फिरायला जाणाऱ्यांना ५०० ते हजार रुपये मिळायचे.

चमचमला हा प्रकार मान्य नव्हता. त्यामुळे त्याने उत्तम बाबाकडे कनिष्ठ तृतीयपंथीयांना त्यांचा वाटा व ऑटोचे भाडे देण्याची मागणी केली होती. जवळपास पंधरा दिवसांपासून त्यांच्यात यावरून वाद सुरू होता. आपल्या गटावरील  वर्चस्व कमी होण्याच्या भीतीतून उत्तम बाबाने साथीदारांच्या मदतीने चमचमच्या खुनाची योजना आखली.

चमचम मंगळवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास  वाटणीसाठी उत्तम बाबाकडे गेला. त्यावेळी सोबत राशी वसंता खोब्रागडे (२८) रा. निर्मल कॉलनी हा होता. यावेळी उत्तम बाबा व साथीदारांनी चमचमवर मोठय़ा चाकूने हल्ला केला.

चमचमचे वाढते प्रस्थ

उत्तम बाबा याच्याविरुद्ध यापूर्वी खुनाचा प्रयत्न, अवैध शस्त्रे बाळगणे, पोलीस ठाण्यात गोंधळ घालणे आदी अनेक गुन्हे दाखल आहेत. शिवाय तो बनावट तृतीयपंथी असल्याची चर्चाही आहे. त्यामुळे  साक्षेगंध, बाळाचा जन्म, मुंज आदी कार्यक्रमांसाठी समाजातून चमचमला मागणी होती. तृतीयपंथीयांमध्येही त्याचे चांगले प्रस्थ निर्माण झाले होते. किमान ३५ तृतीयपंथी त्याला मानत होते. उत्तम बाबाला मानणारे  केवळ १५ तृतीयपंथी राहिल्याने वर्चस्व टिकवण्यासाठी त्याने चमचमला संपवण्याचा निर्णय घेतला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gang war in nagpur
First published on: 05-06-2019 at 01:34 IST