scorecardresearch

‘ ती’ मॅकेनिकच्या प्रेमात पडली आणि दोघांनी घर सोडले

मॅकेनिक युवकाने वस्तीत राहणाऱ्या दहावीच्या विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. लग्न करण्याच्या उद्देशाने तिला घरातून पळवून नेले.

‘ ती’ मॅकेनिकच्या प्रेमात पडली आणि दोघांनी घर सोडले
प्रतिनिधिक छायाचित्र

नागपूर : गॅरेजवर काम करणाऱ्या मॅकेनिक युवकाने वस्तीत राहणाऱ्या दहावीच्या विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. लग्न करण्याच्या उद्देशाने तिला घरातून पळवून नेले. परंतु, पोलिसांनी दोघांनाही शोधून काढले. पोलिसांनी आरोपीला अटक केली तर मुलीला पालकांच्या ताब्यात दिले. मात्र, या अपहरण नाट्यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली होती. फैजान आरीफ शेख (२७) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, मुलगी ही दहावीची विद्यार्थिनी आहे. तिच्या घरासमोर एक गॅरेज आहे. तेथे फैजान शेख हा मॅकेनिक म्हणून काम करतो.

या दोघांमध्ये मैत्री झाली. फैजान रोज तिच्याशी गप्पा करीत शाळेपर्यंत जायला लागला. ती दहावीत असताना तिच्यासमोर त्याने प्रेमाचा प्रस्ताव ठेवला. गेल्या वर्षभरापासून मैत्री ठेवल्यानंतर दोघांनीही प्रेमसंबंध ठेवले. दोघांच्याही वारंवार भेटी व्हायला लागल्या. त्याच्यासोबत शाळा सोडून चित्रपट बघायला जाणे किंवा थेट गॅरेजवर त्याला भेटायला जाणे, असा प्रकार सुरू होता.

हेही वाचा >>> नागपूर : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, तीन महिन्यांची गर्भवती ; प्रियकराविरुद्ध गुन्हा

मावशीला लागली कुणकुण

मुलगी शाळेत न जाता फैजानसोबत फिरायला जात असल्याची कुणकुण तिच्या मावशीला लागली. तिने त्यांच्यावर पाळत ठेवली. गेल्या काही दिवसांपूर्वी दोघांनाही एका चौकात दुचाकीवरून जाताना तिने बघितले.फैजानची कानउघडणी करून पुन्हा मुलीला भेटायचे नाही आणि प्रेमसंबंध तोडण्यास बजावले. तसेच मुलीचीही समजूत घालून अभ्यासावर लक्ष देण्यास सांगितले.

दोघांनी काढला पळ

प्रेमसंबंधाबाबत माहिती झाल्यामुळे दोघांच्याही कुटुंबियांचा विरोध होता. त्यामुळे दोघांनी पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. स्वातंत्र्यदिन (१५ ऑगस्ट) बघून सकाळी ११ वाजता पळून जाण्याचे ठरले. नियोजनाप्रमाणे मुलगी काही कपडे घेऊन गणेशपेठ चौकात आली. फैजान दुचाकीने तेथे आला. तेथून दोघांनीही दुचाकीने पलायन केले. मावशीने पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी दोघांच्याही मोबाईल लोकेशनवरून वडधामना गावातील एका मंदिरातून दोघांनाही ताब्यात घेतले. फैजानला अटक केली तर मुलीला कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.