प्रायोगिक तत्त्वावर दोन झोनमध्ये अंमलबजावणी
नागपूर : शहरात स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत कचरा संकलनाची व्यवस्था अधिक व्यापक आणि पारदर्शक करण्यासाठी क्यूआर कोड पद्धतीवर आधारित घराघरातून कचरा उचलला जाणार आहे. स्मार्ट अॅण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा विषय मंजूर करण्यात आला.
ऑनलाईन माध्यमातून ही बैठक घेण्यात आली. कचरागाडी घरापर्यंत येत नाही. त्यामुळे नियमित कचरा उचलला जात नाही, अशा नागरिकांच्या नेहमीच्या तक्रारींवर आता क्यूआर कोड पद्धतीमुळे अंकुश बसणार आहे. क्यूआर कोडच्या माध्यमातून घरातून कचरा उचलण्यात आला अथवा नाही, याची इत्यंभूत माहिती मिळणार आहे. नागपूर स्मार्ट अॅण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड व नागपूर महापालिकेच्या वतीने प्रायोगिक तत्त्वावर ही आय.सी.टी.वर आधारित पद्धत दोन झोनमध्ये लागू करण्यात येईल. या दोन झोनमध्ये प्रायोगिक तत्त्वावर कचरा गोळा केला जाईल. प्रत्येक घराचे जिओ टॅगिंग केले जाईल आणि नागरिकांच्या घरांवर क्यूआर कोडचे स्टिकर लावण्यात येतील. केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत स्थानिक स्वराज संस्थांना केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त कंपनीसोबत कचरा संकलन, ट्रॅकिंग आणि मॉनिटिरग करण्याची मुभा दिली आहे. कचरा संकलन करणारा कर्मचारी आपल्या मोबाईलद्वारे क्यूआर कोड स्कॅन करेल आणि वजन करून कचरा घेऊन जाईल.
याबाबत महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, घरोघरी कचरा संकलन करणारे स्वच्छतादूत वेळेवर येत नाही, अशी नगरसेवक आणि नागरिकांची तक्रार होती. त्यांच्या वेळासुद्धा निश्चित नसतात. आता स्मार्ट वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीमच्या माध्यमातून नागपूर स्मार्ट सिटी व महापालिका यांच्या सहकार्याने तक्रारींचे निराकरण करणे शक्य होणार आहे. कचरा संकलन करणारे स्वच्छतादूत ज्या घरातील कचरा घेईल त्याचा घर क्रमांक, घरमालकाचे नाव संबंधित अधिकाऱ्यांना प्राप्त होईल. या माध्यमातून नागरिकांची कचऱ्याची समस्या सोडवण्याचा नागपूर महापालिकेचा प्रयत्न आहे.
