यवतमाळ : विदर्भात गौरी पूजनाला विशेष महत्व आहे. गौरी पूजनाला विशेषतः अमरावती विभागात ‘महालक्ष्मी’ असेही संबोधले जाते. घरात अत्यंत पावित्र्य राखून महालक्ष्मी पूजन केले जाते. या निमित्ताने १६ भाज्यांचे विशेष महत्व आहे. हे हेरून यवतमाळ येथे आज सोमवारी भाजी मंडईत भाजी विक्रेत्यांनी नागरिकांना १६ भाज्यांचे मोफत वितरण केले.

१६ भाज्यांचा नैवेद्य हा गौरी, महालक्ष्मीचा आदर आणि स्वागत करण्यासाठी अर्पण केला जातो. ज्यामुळे घरात समृद्धी आणि लक्ष्मी स्थिर राहते अशी श्रद्धा आहे. महालक्ष्मी (गौरी) पूजनामध्ये १६ भाज्यांचे महत्त्व यातून १६ अंकाचे महत्त्व, चंद्राच्या १६ कला, आणि निसर्गाशी असलेला संबंध दर्शविला जातो, असे जाणकार सांगतात. गौरी सणाचा संबंध निसर्गाशी आहे. या काळात निसर्गामध्ये सृजनाचा आविष्कार होत असतो. उत्साह आणि ऊर्जा निसर्गात प्रवाहित असते.

सोळा प्रकारच्या भाज्या (विशेषतः रान भाज्या) निसर्गातील समृद्धीचे प्रतीक मानल्या जातात. या काळात येणाऱ्या भाज्या गौरीला नैवेद्यात दाखवल्या जातात. गणेशाच्या आगमनानंतर चौथ्या दिवशी गौरीचे आगमन होते. दुसऱ्या दिवशी गौरी पूजन आणि नैवेद्य अर्पण केला जातो. या नैवेद्यात १६ भाज्यांसह पुरणपोळी, आंबील, कोहळ्याची भाजी यालाही विशेष महत्व आहे. १६ भाज्या, १६ चटण्या अशी एक आरतीसुद्धा म्हटली जाते.

गौरी पूजन हा सण कुळाचार म्हणून समाजात श्रद्धापूर्वक पाळला जातो. गौरी पूजन म्हणजे कन्या अडीच दिवसांसाठी माहेराला येण्याचा सोहळा आहे. ज्येष्ठा गौरी आवाहन, ज्येष्ठ गौरी पूजन आणि आणि ज्येष्ठ गौरी विसर्जन, हा सण माहेरवाशीणींचा असल्यामुळे तिच्या आवडीचे पदार्थ करण्यात येतात. गौरी आवाहनाच्या दिवशी गौरीला घरातील भाजी आणि भाकरीचा नैवेद्य अर्पण करण्यात येतो. ज्येष्ठा गौरी पूजनाच्या दिवशी तिच्यासाठी पंचपक्वानांचा नैवेद्य केला जातो. पूर्वीच्या काळी नैवेद्यात १६ भाज्या, १६ प्रकारच्या चटण्या असायच्या. आताही ग्रामीण भागात ही परंपरा पाळली जाते.

ग्रामीण भागात नैवेद्यात रान भाज्यांना स्थान दिले जाते. यामध्ये पालक-मेथी, चुका, आळू, अंबाडी, पत्ताकोबी, फुलकोबी, लाल भोपळा, गिलके, दोडका, गवार, वालाच्या शेंगा, कारले, भेंडी, पडवळ, शेवग्याच्या शेंगा, मिरची, दुधी भोपळा, चाकी, चवळी अशा भाज्या केल्या जातात. शहरी भागात प्रचलित भाज्या वापरतात. या नैवेद्यात आंबील आणि गुळवणीला फार महत्व आहे. ज्वारी भिजवून त्याचे ओलसर पीठ दही आणि पाण्यात शिजवून ही आंबील गुळाचा पाक किंवा दुधात मिसळून खाल्ली जाते.

१६ अंकाचे महत्व

गौरी उत्सवामध्ये १६ या अंकाचे विशेष महत्त्व आहे. १६ भाज्यांचा नैवेद्य अर्पण केल्याने गौरी प्रसन्न होते आणि घरात लक्ष्मी स्थिर राहते, तसेच घरात भरभराट आणि आनंद येतो, अशी श्रद्धा आहे. पूर्वी घरातील मुलगी १६ वर्षांची झाली की, परिपक्व झाली असे समजायचे. कन्येची स्त्री होण्याचं हे वय मानलं जायचं. याशिवाय १६ हा अंक मातृदेवतेचा असल्याने त्याला महत्व आहे. ज्येष्ठा गौरी या प्रत्येक घरी परंपरेनुसार आणल्या जातात. काही ठिकाणी मुखवट्याच्या, तर काही ठिकाणी खड्याच्या गौरी बसवतात. हा माहेरवाशींणींचा सण असून त्यांच्यासाठी आनंदाचा दिवस असतो. या दिवशी मुली माहेरी येतात आणि सुना त्यांच्या माहेरी गौरी पूजनासाठी जातात अशीही प्रथा अनेक भागात आहे.