अकोला : मूळची अकोल्यातील रहिवासी अठरा वर्षीय तरुणीवर अत्याचार करून सुरक्षारक्षकाने तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना मुंबईतील मरीन ड्राईव्ह येथील वसतिगृहात घडली. या प्रकरणातील आरोपीनेदेखील आत्महत्या केली. ५ जूनला परीक्षा झाल्याने ती तरुणी ८ जून रोजी अकोल्यात परतणार होती. मात्र, ६ जून रोजीच हा अनर्थ घडला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसतिगृहातील सुरक्षारक्षक आपल्याला त्रास देत असल्याची तक्रार तरुणीने आपल्या पालकांकडे केली होती. त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. तीन वर्षे तरुणीने मुंबईत पॉलिटेक्निकचे शिक्षण घेतले. शेवटी ती अकोल्यात परतली नाहीच. याला वसतिगृह प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप तरुणीच्या पालकांनी करून न्यायाची मागणी केली आहे.

मुंबईतील मरीन ड्राईव्ह येथील सावित्रीबाई फुले महिला छात्रालय येथील चौथ्या मजल्यावरील खोलीमध्ये अकोल्यातील तरुणी राहत होती. खोलीतच मंगळवारी सायंकाळी विवस्त्र अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला. ओढणीने गळा आवळून या तरुणीची हत्या करण्यात आली. खोलीचा दरवाजा बाहेरून बंद होता. त्यामुळे बलात्कार करून हत्या करण्यात आल्याचा संशय असून, शवविच्छेदन अहवालानंतर लैंगिक अत्याचार झाला होता का, ते स्पष्ट होईल. दरम्यान, या प्रकरणातील आरोपीने रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली.

हेही वाचा – वनरक्षक भरती, २१३८ जागांसाठी जाहिरात, बारावी उत्तीर्ण उमेदवारांना सुवर्ण संधी

तरुणी पॉलिटेक्निकचे शिक्षण घेण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून मुंबई येथील वसतिगृहात राहत होती. ५ जूनला तिचा शेवटचा पेपर झाला. अकोल्यात परत येण्यासाठी तिने ८ जून रोजीचे रेल्वे आरक्षणदेखील केले होते. गेल्या काही दिवसांपासून तिला वसतिगृहाच्या सुरक्षारक्षकापासून त्रास होता. गत १५ दिवसांपासून हा त्रास वाढला होता, अशी माहिती तरुणीच्या पालकांनी दिली. वसतिगृहाच्या चौथ्या मजल्यावरील खोलीत तरुणीला एकटीला ठेवण्यात आले होते. तिच्यासोबत दुसऱ्या मुलीला किंवा इतर मुलींसोबत तिला ठेवण्यात आले नव्हते. या सर्व प्रकाराला वसतिगृह प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप पालकांनी केला आहे.

हेही वाचा – चीन सरकारने पंचेन लामांची तत्काळ सुटका करावी; इंडो-तिबेट फ्रेंडशिप असोसिएशनच्या बैठकीत मागणी

वसतिगृहातील जबाबदार दोन महिला कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे, अन्यथा आम्ही तरुणीचा मृतदेह नेणार नाही, असा पवित्रा संतप्त पालकांनी घेतला. मुलीच्या सुरक्षेच्या कारणावरून आम्ही तिला खासगी वसतिगृहात न ठेवता शासकीय वसतिगृहात ठेवले होते. मात्र, येथे रक्षकच भक्षक बनले, असे तरुणीचे वडील म्हणाले.

More Stories onअकोलाAkola
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Girl physically abuse and murder in a hostel at marine drive and was to return to akola on june 8 ppd 88 ssb
First published on: 07-06-2023 at 15:45 IST