गोंदिया : काॅंग्रेसचे गोंदिया जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिलीप बन्सोड यांच्याविरोधात काॅंग्रेसमधल्या एका गटाने वज्रमुठ बांधली आहे. काँग्रेस भोला भवनात साखळी उपोषणाच्या माध्यमातून प्रदेश नेतृत्वाचे लक्ष वेधले. प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे हे काल उपोषणस्थळी येऊन गेले. पुढील १० दिवसात तोडगा काढू, असे आश्वासन दिल्याने उपोषण स्थगित करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी तक्रारींचा पाढा वाचल्यानंतर गावंडे यांनी जिल्हाध्यक्षांसह उपाध्यक्षांवर कार्यवाहीचे ठोस आश्वासन दिले. त्यामुळे दोघांचीही लवकरच हकालपट्टी होण्याचे संकेत आहेत. तसे कार्यकर्त्यांमधूनही बोलले जात आहे.      

२०१९ मध्ये तिरोडा विधानसभा क्षेत्रातून तिकीट न मिळाल्याने दिलीप बन्सोड यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसला सोडून काॅंग्रेसचा हात धरला. माजी आमदार आणि अनुभवाच्या जोरावर प्रदेश नेतृत्वाने त्यांना आल्याआल्या गोंदिया जिल्हाध्यक्षपद दिले. पद मिळताच त्यांनी एकाधिकारशाहीपणाचे धोरण अवलंबिले. कार्यकर्त्यांची कुठलीही बाजू एकून न घेता परस्पर निर्णय घेणे, बैठका न घेणे हा त्यांचा स्वभाव बनला. त्यामुळे सुरुवातीपासूनच त्यांच्याविरोधात कार्यकर्त्यांमध्ये असंतोष होता. हा असंतोष काही दिवसांपूर्वीच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने उफाळून आला. या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत तडजोड करू नये, अशा प्रदेश काॅंग्रेसच्या स्पष्ट सूचना असताना जिल्हाध्यक्ष बन्सोड आणि उपाध्यक्ष गप्पु गुप्ता यांनी भाजपसोबत हातमिळवणी केली.

हेही वाचा >>> आता बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सरकार देणार ५० हजार रुपये, एक अर्ज करा आणि…

सभापती, उपसभापतीच्या निवडणुकीत काॅंग्रेसच्या उमेदवाराला दूर सारले. त्यामुळे जिल्हाध्यक्ष, उपाध्यक्षांना पदावरून हटवावे, अशी मागणी काही संचालक व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केली. गोंदिया जिल्हा ” काॅंग्रेस वाचवा “समितीची स्थापना करत  साखळी उपोषण केले. प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन कार्यकर्त्यांच्या भावना जाणल्या. लवकरच ठोस कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले. यावरून कार्यकर्त्यांनी तुर्तास उपोषण मागे घेतले. जिल्हाध्यक्ष, उपाध्यक्ष पदावरून हटलेच पाहिजे, अशी कार्यकर्त्यांची भूमिका आहे. अन्यथा १५ जूननंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असेही कार्यकर्त्यांनी सांगितले. त्यामुळे जिल्ह्यात काॅंग्रेसला वाचविण्यासाठी जिल्हाध्यक्ष आणि उपाध्यक्षांना बदलणे गरजेचे झाले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लहान कार्यकर्त्यांवर अन्याय होत असेल तर पक्ष नेतृत्वाने दखल घेतली पाहिजे. –अमर वराडे, महाराष्ट्र प्रदेश सचिव, काॅंग्रेस कमिटी.