नागपूर : नाशिक, रायगडच्या पालकमंत्रिपदावरून गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये सुरू असलेल्या वादाचे लोण विदर्भातील गोंदिया जिल्ह्यापर्यंत पोहोचले आहे. राज्य सरकारने स्वातंत्र्य दिनाला कोण कुठे ध्वाजारोहण करणार याची यादी जाहीर केल्यानंतर गोंदियाला ध्वजारोहणाची जबाबदारी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे सोपवण्यात आली होती. परंतु त्यांनी त्यास नकार दिल्याने आता मंत्री मंगलप्रसाद लोढा हे ध्वजारोहण करणार आहेत.
छगन भुजबळ हे नाशिकचे असल्याने त्याांना तेथे ध्वजारोहण क रण्याची इच्छा होती.पण तो मान भाजप नेते व मंत्री गिरीश महाजन यांना देण्यात आला आहे. त्यामुळे छगन भुजबळ नाराज झाले. एकूणच पालकमंत्री पदावरून महायुतीत चागलेच मतभेद उफाळून आल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे गोंदिया जिल्हा हा राष्ट्रवादीचे नेते व राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल यांचा जिल्हा आहे. या जिल्ह्याचे पालकमंत्री राष्ट्रवादीचेच मंत्री बाबासाहेब पाटील आहे. पण ते त्यांच्या जिल्ह्यात ध्वजारोहण करणार आहे. त्यामुळे गोंदियाची जबाबदारी राष्ट्रवादीचेच ज्येष्ठ नेते म्हणून छगन भुजबळ यांच्याकडे देण्यात आल्याची माहिती आहे.पण त्यांनी थेट नकार दिला.
२०२७ मध्ये नाशिकमध्ये कुंभमेळा होत असल्याने नाशिक पालकमंत्रिपदासाठी तिन्ही पक्ष दावा करत आहे. राज्य सरकारकडून नाशिकमध्ये ध्वाजारोहण करण्याची जबाबदारी गिरीश महाजन यांना देण्यात आल्याने शिवसेना नेते दादा भुसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. नाशिक येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वाजारोहण करण्याची संधी न मिळाल्याने मंत्री छगन भुजबळ नाराज असल्याने त्यांनी गोंदियामध्ये ध्वाजारोहण करण्यास नकार दिल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोराने सुरु आहे.
भुजबळ यांच्या नकारामुळे ते जसे भाजपवर नाराज आहे तसेच ते राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांवरही नाराज असल्याचे संकेत मिळते. मुख्यमंत्र्यांनीही त्यांची समजूत न काढता त्यांच्या नकारानंतर तत्काळ निर्णय घेत ही जबाबदारी लोढा यांच्याकडे सोपवली. यारून मुख्यमंत्री ज्येष्ठ मंत्र्यांच्या नाराजीला भीक घालत नसल्याचे यावरून स्पष्ट होते. महायुतीतील घटक पक्ष शिवसेना शिंदे गट आधिच भाजपवर नाराज आहे. आता राष्ट्रवादीचीही वाटचाल त्याच दिशेने सुरू असल्याचे दिसून येते. स्वातंत्र दिनाला मांस विक्री बंदीच्या निर्णयाविरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कालच जाहीर नाराजी व्यक्त केली होती. दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्र्यांच्या निर्णया विरोधात भुजबळांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे महायुतीत आलबेल नाही हे स्पष्ट झाले आहे.