गोंदिया: महायुती सरकारने गेल्या वर्षी नागपूर येथे झालेल्या विधानसभेच्या अधिवेशनात धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर २०,००० रुपये बोनस (प्रोत्साहन रक्कम) जाहीर केली होती. २५ मार्च रोजी यासंदर्भात एक सरकारी परिपत्रकही जारी करण्यात आले होते. परंतु त्यानंतर सुमारे अडीच महिने उलटूनही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बोनसची रक्कम न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये निराशेचे वातावरण निर्माण झाले होते. पण आता १२ जून रोजी महाराष्ट्र राज्य सहकारी महासंघ मुंबईचे मुख्य व्यवस्थापक डी.आर. भोकरे यांनी गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी १८० कोटी ६१ लाख ५३ हजार रुपयांचा बोनस जाहीर केला.
गोंदिया जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला ३८० रुपये वाटपा बाबत पत्र देऊन सरकारी पोर्टलवर नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना पिकाच्या आधारावर बोनस रक्कम देण्याबाबत कळविण्यात आले आहे. त्यामुळे लवकरच जिल्ह्यातील सुमारे दीड लाख शेतकऱ्यांना बोनस वाटप होण्याची शक्यता आहे.
बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके आणि मजुरी यांचे वाढलेले दर यामुळे गोंदियातील शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढला आहे. उत्पादन खर्चाच्या तुलनेत धानपिकाला मिळणारा दर कमी असल्याने भात लागवडीत कोणताही नफा मिळत नाही. केंद्र सरकारने धान पिकासाठी दिलेला आधारभूत भावही कमी आहे हे लक्षात घेऊन, राज्य सरकारे त्यांच्या राज्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देतात.
वर्षभरापूर्वी सरकारने केली होती घोषणा
गेल्या वर्षी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात धानाला बोनसची घोषणा सरकारद्वारे करण्यात आली होती. पण याला बराच काळ लोटून सुद्धा बोनसचा थांगपत्ता नव्हता. त्यामुळे धान उत्पादक शेतकरी वर्गात निराशेचे वातावरण निर्माण झाले होते. पण आता या संदर्भातील पत्र जिल्हा मार्केटिंग अधिकारी, गोंदिया कार्यालयाला मिळाले असून लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात बोनसची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल.
वितरण प्रक्रिया उद्यापासून…
गोंदिया जिल्ह्यातील महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशनच्या सरकारी धान खरेदी केंद्रांवर ऑनलाइन नोंदणी केलेल्या सुमारे १.५ लाख शेतकऱ्यांना बोनसचा लाभ मिळणार आहे. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य सहकारी महासंघ मुंबईचे मुख्य व्यवस्थापक यांनी आदेश जारी केलेले पत्र प्राप्त झाले आहे. सोमवार, १६ जूनपासून पुढील कार्यवाही सुरू केली जाईल, अशी माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी विवेक इंगळे यांनी दिली.