गोंदिया: सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून सगळीकडेच नदी, तलाव आणि पाण्याच्या जोखमीच्या भागात सावधगिरी बाळगण्यासाठी प्रशासनाकडून अनेक सूचना दिल्या जातात. नद्यांपासून दूर राहण्याचे इशारा दिला जातो. परंतु तरीही बहुतेक लोक या सूचना आणि खबरदारीकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे दुर्घटना घडते. अशीच एक घटना घडली. नदीत आंघोळीसाठी गेलेले ३ तरुण नदीत बुडाले. मंगळवारी सायंकाळी ६:३० वाजताच्या सुमारास घडली .
वारासिवनी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहित महेश बुर्डे (२०) रा. बेनी जिल्हा बालाघाट, अखिल चमनलाल बुर्डे (२१) रा. बेनी जिल्हा बालाघाट आणि राकेश नंदनवार रा.तुमसर जि. भंडारा असे वैनगंगा नदीत बुडालेल्या तरुणांची नावे आहेत. बालाघाट जिल्ह्यातील वारासिवनी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास, अखिलचे वडील चमनलाल बुर्डे सोबत महेश,अखिल आणि राकेश हे तिघेही तरुण रामपायली तालुक्यातील वैनगंगा नदीत आंघोळीसाठी गेले होते. त्यांच्यासोबत अखिलचे वडील चमनलाल बुर्डे देखील नदीकाठी उपस्थित होते. आंघोळ करत असताना, तिन्ही तरुण नदीच्या खोल पाण्यात गेले आणि बुडू लागले. हे पाहून अखिलचे वडील चमनलाल यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना तिन्ही तरुणांपैकी कोणालाही वाचवता आले नाही आणि ते तिघेही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले.
मंगळवारी सायंकाळी या घटनेची बातमी गावात पसरली, त्यामुळे गावकऱ्यांचा जमाव नदीकाठी जमला. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी बालाघाट जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन पथकाला माहिती दिली. मंगळवारी अंधार झाला असल्याने तरुणांचा काहीही शोध लागला नाही. त्यानंतर पोलिसांनी अंधारामुळे शोध थांबवला आणि बुधवारी सकाळपासून तरुणांचा शोध घेण्याला सुरुवात केली असता मोहित महेश बुर्डे आणि अखिल चमनलाल बुर्डे या दोघांचे मृतदेह दुपारपर्यंत सापडले. पण भंडारा जिल्ह्यातील राकेश नंदनवार यांच्या मृतदेह अद्यापही पथकाला सापडलेला नाही करिता शोध कार्य सुरूच आहे. गावकऱ्यांनी दिलेला माहितीनुसार बालाघाट जिल्ह्यात रक्षाबंधन नंतर भुजली उत्सव साजरा केला जातो त्याकरिता राकेश नंदनवार हे भंडारा जिल्ह्यातून बालाघाट जिल्ह्यात गेले होते. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास सदर तिघेही तरुण चमनलाल बुर्डे यांच्यासोबत अंघोळी करिता वैनगंगा नदीच्या पात्रात गेलेले होते.