गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठात कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या वेतनातून संबंधित कंत्राटदार कंपनी मोठी कपात करीत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. कंपनीतील कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता विद्यापीठातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुद्धा पैसे द्यावे लागतात. त्यामुळे ही कपात करण्यात येत असल्याचे उत्तर मिळाल्याचे, तक्रारीत नमूद आहे. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाचा कार्यप्रणालीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
काही दिवसांपूर्वी शेखर देशपांडे यांनी सर्व सिनेट सदस्यांना ‘ईमेल’च्या माध्यमातून एक तक्रार केली होती. यात त्यांनी धक्कादायक खुलासे केले आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियुक्तीच्यावेळी ठरवण्यात आलेल्या वेतनात आणि प्रत्यक्ष मिळणाऱ्या वेतनात मोठी तफावत असल्याचे म्हटले आहे.
विद्यापीठाकडून बाह्यस्त्रोत यंत्रणेला एका कंत्राटी कर्मचाऱ्यामागे २४ हजार रुपये देण्यात येतात. परंतु कंत्राटदार कंपनी कर्मचाऱ्यांकडून १८ हजारावर स्वाक्षरी घेत केवळ १२ हजार वेतनाच्या स्वरूपात देतात.
त्यांना विचारणा केली असता कुलसचिव व विद्यापीठातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही आम्हाला पैसे द्यावे लागतात, असे उत्तर मिळते. यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक शोषण होत असून यासंदर्भात विद्यापीठ प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी देखील तक्रारीत करण्यात आली आहे. या तक्रारीमुळे विद्यापीठ प्रशासनात खळबळ उडाली असून प्र-कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली आहे. सिनेट सदस्यांनीही या संदर्भात चौकशीची मागणी केली आहे.
कुलसचिव व वरिष्ठ अधिकारी अडचणीत
विद्यापीठात कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी बाह्य स्त्रोत यंत्रणेला काम देण्यात आले आहे. तक्रारीत नमूद आरोपावरून मागील अनेक महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचे आर्थिक शोषण होत असल्याचे दिसून येते. मात्र, कर्मचारी याविषयी बोलण्यास घाबरतात. कंपनीचे अधिकारी कुलसचिव आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना पैसे द्यावे लागतात. असे गंभीर आरोप करणारे उत्तर देत असल्याने कुलसचिव आणि वरिष्ठ अधिकारी अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत.
सदर तक्रार प्राप्त झाल्यानंतर प्र-कुलगुरू यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली आहे. सोबत संबंधित कंपनीला दस्ताऐवज सादर करण्याचे निर्देशित करण्यात आले. कुणीही दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल. – डॉ. अनिल हिरेखण, कुलसचिव गोंडवाना विद्यापीठ.