scorecardresearch

गोंदिया : कॉन्व्हेंट संचालकाच्या मुलाची विद्यार्थिनींना अमानुष मारहाण, पालकांचा संताप अनावर

मॉडेल कॉन्व्हेंटचे संचालक आर.डी. कटरे यांचा मुलगा वैभव कटरे याने २४ फेब्रुवारी रोजी शाळेतील ९ व्या वर्गातील विद्यार्थिनींना किरकोळ कारणावरून अमानुष मारहाण केली.

Goregaon City model Convent
कॉन्व्हेंट संचालकाच्या मुलाची विद्यार्थिनींना अमानुष मारहाण (छायाचित्र – लोकसत्ता टीम/ग्राफिक्स)

गोंदिया : गोरेगाव शहरातील मॉडेल कॉन्व्हेंटचे संचालक आर.डी. कटरे यांचा मुलगा वैभव कटरे याने २४ फेब्रुवारी रोजी शाळेतील ९ व्या वर्गातील विद्यार्थिनींना किरकोळ कारणावरून अमानुष मारहाण केली. त्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थिनींच्या पालकांनी शाळेतील दोषी संचालकाच्या मुलावर कारवाई करण्याची मागणी केली.

२४ फेब्रुवारी रोजी संस्थेचे संचालक आणि सचिव यांनी शाळेतील प्रयोग शाळेचे दार तोडणाऱ्या विद्यार्थिनींना उठ बस करण्याची शिक्षा झाल्याची माहिती संचालक आर.डी. कटरे यांचा मुलगा वैभव कटरे याला दिली. दरम्यान वर्गात येऊन वैभव कटरे यांनी प्रयोग शाळेचे दार तोडणाऱ्या विद्यार्थिनींनी पुढे यावे, अन्यथा संपूर्ण वर्गाला शिक्षा होईल, असे सांगितले. त्यामुळे पाच विद्यार्थिनी घाबरून पुढे आल्या, त्यानंतर वैभव कटरे याने शाळेतील शिपायामार्फत काठी बोलावून विद्यार्थिनींच्या तळहातावर अमानुषपणे मारहाण केली.

हेही वाचा – नागपूर : फिजिओथेरापीस्टकडे उपचार घेताना ‘ तो’ पडला प्रेमात आणि केले अश्लील चाळे

या घटनेची माहिती सर्व विद्यार्थिनींनी सायंकाळी घरी पोहोचल्यानंतर त्यांच्या पालकांना दिली. त्यानंतर २५ फेब्रुवारी शनिवारला सकाळी पालकांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी शाळा गाठून संचालकाच्या मुलावर कारवाईची मागणी केली. प्रकरणाची तक्रार पोलिसात नोंदविण्यात आली नाही. विशेष म्हणजे, शाळेच्या प्रयोगशाळेचे दार आधीच तुटले होते. त्याची माहिती विद्यार्थिनींनी मुख्याध्यापकांना दिली होती. याची माहिती मिळताच संचालक आर.डी. कटरे यांनी शाळेत पोहोचून त्या विद्यार्थिनींना ५०-५० उठाबशाची शिक्षा देऊन प्रकरण मिटवले होते. मात्र असे असतानाही वैभव कटरे तेथे पोहोचले आणि त्यांनी विद्यार्थिनींना बेदम मारहाण केली.

हेही वाचा – नागपूर : दारुड्या मामाची १७ वर्षीय भाचीवर वाईट नजर पडली आणि..

शनिवारी पालकवर्ग आणि शाळा व्यवस्थापनात चर्चा झाली आणि घडलेल्या प्रकाराबद्दल व्यवस्थापनाकडून पालकांची समजूत काढून या पुढे असे घडणार नाही म्हणत दिलगिरी व्यक्त केल्यामुळे पालकवर्ग शांत झाले व पुढे कुठेही तक्रार करणार नाही याची हमी दिली. त्यामुळे प्रकरण शाळेच्या आवारातच संपुष्टात आले. पण गोरेगाव शहरात विद्यार्थिनींना अमानुष मारहाणीची चर्चा तर आहेच.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-02-2023 at 15:00 IST
ताज्या बातम्या