नागपूर: महाराष्ट्राच्या विद्यापीठांमधील अनेक महिन्यांपासून कुलगुरूंची नियुक्ती रखडलेली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल राधाकृष्णन नुकतेच उपराष्ट्रपती झालेले आहेत. त्यामुळे या प्रक्रियेला पुन्हा ब्रेक लागला होता. मात्र नुकतेच गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल पदाची शपथ घेतल्यामुळे लवकरच कुलगुरू नियुक्तीची प्रक्रिया प्रक्रियेला गती येण्याची शक्यता आहे. अशातच राज्यपाल कार्यालयातून एक महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू पदाची प्रतीक्षा आता संपली आहे. तब्बल ७६ उमेदवारांनी कुलगुरूसाठी अर्ज केले असून छाननीनंतर २८ उमेदवारांना सादरीकरणासाठी ‘ई मेल’ पाठवण्यात आल्याची माहिती आहे. या उमेदवारांचे ३ आणि ४ ऑक्टोबरला सादरीकरण होणार आहे. यामध्ये नागपूर विद्यापीठाशी संलग्नित आठ ते दहा उमेदवार असून काही कुलगुरू आणि प्राचार्यांचाही समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सादरीकरणानंतर यापैकी अंतिम पाच उमेदवारांची मुलाखतीसाठी निवड होणार आहे.

नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी सात ऑगस्टपर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. शेवटल्या दिवसांपर्यंत जवळपास ७६ इच्छुक प्राध्यापकांनी कुलगुरू पदासाठी अर्ज केले होते. विद्यापीठाचे दिवंगत कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांचे निलंबन झाल्यानंतर त्यांच्या निधनापासून कुलगुरूपद हे प्रभारींच्या भरवशावर आहे.

विद्यापीठाच्या संयुक्त समितीने कुलगुरू निवडीसाठी प्रो. अग्रवाल यांची निवड केली होती. त्यानंतर राज्यपालांनी समितीची निवड केली. या समितीद्वारे कुलगुरूपदाच्या अर्ज प्रक्रियेबाबत सात जुलैला जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. सात ऑगस्ट ही अर्ज करणाची शेवटली तारीख होती. त्यानुसार कुलगुरुपदासाठी जवळपास ७६ इच्छुकांनी अर्ज केलेत. त्यानंतर अर्जाची छाननी, सादरीकरण आणि त्यांच्या मुलाखती घेतल्या जातात. त्यापैकी अंतिम पाच जणांची राज्यपाल कार्यालयाद्वारे मुलाखत घेतल्यावर विद्यापीठाला नवीन कुलगुरू मिळणार आहे.

प्रक्रिया सुरू असली तरी, यापूर्वीच कुलगुरूपदाच्या निवडीसाठी दीड वर्षाचा कालावधी निघून गेला आहे. आचार्य देवव्रत यांनी दोन दिवसांआधीच महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून शपथ घेतली. त्यामुळे कुलगुरू निवडीच्या प्रक्रियेला गती येणार आहे.