नागपूर: भारतीय बुद्धिबळ ग्रँडमास्टर दिव्या देशमुख सध्या सर्वत्र चर्चेत आहे. नुकताच नागपूरमध्ये तिचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. तर सरन्यायाधीश भूषण गवई यांनीही दिव्याच्या घरी जात तिचे स्वागत व कौतूक केले.

यानंतर दिव्याच्या आयुष्यातील अनेक गोष्टी पुढे यायला लागल्या आहेत. ग्रँडमास्टर दिव्या देशमुखला बुद्धीबळ स्पर्धेची आवड कुठून निर्माण झाली असाही प्रश्न अनेकांना पडतो. याचे उत्तर म्हणजे दिव्याच्या रक्तातच बुद्धीबळ असल्याची माहिती समोर आली आहे. तिचे पणजोबा आणि विनोबा भावे बुद्धीबळ खेळतानाचा फोटाही देशमुख कुटूंबाकडे आहे. जगातील महिला बुद्धिकर विश्वचषक जिंकणारी सर्वांत तरुण आणि एकमेव भारतीय महिला बुद्धिबळपटू दिव्या देशमुख हिच्यासाठी बुद्धिबळ हा केवळ खेळ नाही, बुद्धिबळ तिच्या रक्तात आहे. तिच्या आईचे आजोबा अर्थात तिचे पणजोबा सुद्धा बुद्धिबळ खेळत. ते महात्मा गांधीचे आध्यात्मिक उत्तराधिकारी व भूदान चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबा भावेंचे स्नेही होते.

भावे व दिव्याचे पणजोबा फावल्या वेळात बुद्धिवळ खेळत असल्याचे पुरावे देशमुख कुटुंबाकडे आहेत. या दोषांचा बुद्धिबळ खेळतानाचा एक दुर्मिळ फोटो आजही कुटुंबाचे जतन करून ठेवलेला आहे. यावर दिव्याची आई डॉ. नम्रता देशमु‌ख म्हणाल्या, ही बुद्धिवळाची ओढ तिच्या रक्तातच आहे. माझे आजोबा म्हणजे माइया आईचे वडील डॉ. दुर्गाप्रसाद शर्मा हे विनोबाजीचे अत्यंत निकटवर्तीय होते. पवनार आश्रमात दर शनिवारी ते दोघे बुद्धिवळ खेळत.

डॉ. नम्रता व त्यांचे पती डॉ. जितेंद्र हे दोघेही डॉक्टर आहेत. त्यांनी दिव्याला बुद्धिबळाच्या दिशेने वळवण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी मोठी मुलगी आर्या ही बास्केटबॉल आणि बंडमिंटनमध्ये रमलेली होती. पण, नम्रता यांना आपल्या धाकट्या मुलीने बुद्धिबळ खेळावे, अशी इच्छा होती. २०१०मध्ये फक्त पाच वर्षाची असताना दिव्याला नागपूरमधील शंकरनगर येथील राहत्या कॉलनीजवळ असलेल्या राहुल जोशी यांच्या बुद्धिबळ अकादमीत दाखल करण्यात आले. नम्रता म्हणाल्या, मी माझ्या लहानपणापासून आजोबा आणि विनोबाजी यांना बुद्धिबळ खेळताना पाहिले होते. त्याचे आकर्षण माझ्या मनात होते. तेच दिव्यामध्ये उतरले.

दोन वर्षांतच, २०१२ मध्ये दिव्याने आपले पहिले राष्ट्रीय सुवर्णपदक जिंकले आणि तिच्या यशाचा प्रवास सुरू झाला. प्रत्येक वयोगटात पदके जिंकत, पण नियमित शिक्षणापासून दूर राहात दिव्याने ओपन स्कूलिंगमार्फत बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. आता ती पदवी शिक्षकही खुल्या शिक्षणपद्धतीतून पूर्ण करत आहे. प्रत्येक वेळेस दिव्या आंतरराष्ट्रीय पदक जिंकते, तेव्हा देशमुख कुटुंबात तिच्या पणजोबांची आठवण काढली जाते.