गुरुनानक शाळेची विद्यार्थ्यांना प्रवेश बंदी; शासनाचा आदेश झुगारून शाळेला ठोकले कुलूप

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शासनाच्या आदेश झुगारून गुरुनानक प्राथमिक, माध्यमिक व कनिष्ठ कनिष्ठ महाविद्यालयाने गुरुवारी विद्यार्थ्यांना प्रवेश न देता शाळेला कुलूप ठोकले. इतकेच नाही तर पालक शाळेला इजा पोहोचवतील, असा अतार्किक विचार करून विद्येच्या पवित्र मंदिरात पोलिसांचा प्रचंड फौजफाटाही तैनात करून टाकला. शाळा व्यवस्थापनाच्या या कृतीवर पालकांनी संताप व्यक्त केला.

शीख शिक्षण संस्थेद्वारा संचालित ही जुनी व इंग्रजीतून शिक्षण देणारी अनुदानित शाळा आहे. त्यामुळे स्वस्त दरात चांगले शिक्षण या शाळेत मिळते. हजारोंच्या संख्येने दरवर्षी विद्यार्थी या शाळेत प्रवेश घेतात. मात्र, संस्थेला ही शाळा बंद करून त्याठिकाणी सीबीएसईची शाळा आणायची असल्याने अनुदानित शाळा बंद करीत असल्याचा आरोप पालक करीत आहेत. सध्या हे प्रकरण न्यायालयात आहे. पालक आणि शाळेतील शिक्षक शाळा बंद होऊ नये, म्हणून विशेष प्रयत्न करीत आहेत. शिक्षकांनाही सेवानिवृत्ती घ्या किंवा राजीनामा द्या, असे व्यवस्थापनाकडून सांगितले जात आहे. मात्र, पालक, शिक्षक आणि त्या भागातील नागरिक या सर्वानाच शाळा सुरू राहिल्या पाहिजे असे वाटत असल्याने गेल्या काही महिन्यांपासून पालक संघर्ष समिती सक्रिय आहे. समितीच्यावतीने शाळा, संविधान चौकात अनेक आंदोलने करण्यात आली.

शिक्षण उपसंचालकांना त्यांनी सर्व वृत्तांत सांगितला. उपसंचालकांनी १५ मे पासून शाळेत प्रवेश देण्याचे निर्देश दिले होते. मात्र, पालकांनी उगीच गोंधळ नको, अशी समंजस भूमिका घेऊन एक-दोन दिवसांनी शाळेत पाल्यांचे प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ते बुधवारी शाळेत गेले.

मात्र, त्यांच्या पाल्यांना प्रवेश देण्यात आला नाही. आज मोठय़ा संख्येने पालक शाळेत गेले तेव्हा व्यवस्थापनाने पालक तोडफोड करतील म्हणून पोलीस बंदोबस्त मागवला होता. तसेच शाळेला कुलूप लावून ते चालले गेले. त्यानंतर शिक्षण उपसंचालक कार्यालयातील एक अधिकारी राठोड यांनीही शाळेला भेट देऊन सर्व वृत्तांत वरिष्ठांच्या कानावर घातला.

‘‘पहिली आणि पाचवीमध्ये मुलांचा प्रवेश देण्यासाठी पालक आज शाळेत गेले होते. शिक्षण उपसंचालकांनी शाळेला प्रवेश देण्याचे निर्देश दिले होते.  मात्र, मुख्याध्यापक आणि व्यवस्थापनाने शाळेत पोलीस बोलावले तसेच शाळेला कुलूपही लावले. आमच्या भागातील इंग्रजी माध्यमातील सर्वात नावाजलेली शाळा असून याठिकाणी प्रवेशही कमी नसतात. मात्र, व्यवस्थापन ही शाळा बंद करीत आहे.’’    – संदेश वासनिक, पालक

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Guru nanak school students ban in school admission
First published on: 18-05-2018 at 00:48 IST