बुलढाणा : जिल्ह्याच्या शेगाव तालुक्यातील केसगळती व टक्कल या अनामिक व अजूनही पूर्णपणे निर्मूलन न झालेल्या आजाराची दहशत कायम आहे. चार महिन्यांनंतरही भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचा (आयसीएमआर ) अहवाल लालफीतशाहीतच अडकला असून गुलदसत्यातच आहे. या विचित्र आजाराने घाटावरील तालुक्यातही प्रवेश केला आहे. मात्र त्यावर ठोस उपाययोजना वा उपचार करण्यात जिल्ह्याचीच नव्हे तर देशाची आरोग्य यंत्रणा अपयशी ठरली, असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरणार नाही.

या पाठोपाठ आता शेगाव तालुक्यात नखगळतीचे संकट उभे ठाकले आहे. गुरुवार, १७ एप्रिलला करण्यात आलेल्या सर्वेक्षणाअंती शेगाव तालुक्यातील चार गावांत नखगळतीचे तब्बल ३७ रुग्ण आढळून आले आहे. यातील बव्हंशी रुग्ण हे केसगळतीचे रुग्ण असल्याचे आढळून आले आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या वरिष्ठ सूत्रांनी ‘लोकसत्ता’सोबत बोलताना ही महत्त्वपूर्ण व तितकीच धक्कादायक माहिती दिली.

चार गावांत प्रादुर्भाव

काही दिवसांपूर्वी नखगळतीचे ५ ते ६ रुग्ण आढळून आले होते. मात्र याचा गाजावाजा झाला नाही. यानंतर गुरुवारी ‘लोकसत्ता’ने यावर प्रकाश टाकताच आरोग्य यंत्रणा खळबळून जागा झाल्या. यामुळे जिल्हा परिषदेच्या नियंत्रणाखालील जिल्हा आरोग्य विभागाचे एक पथक शेगाव तालुक्यात दाखल झाले. तालुका आरोग्य विभाग, भोनगांव प्राथमिक आरोग्य केंद्र यांनी आज युद्धपातळीवर चार गावात पाहणी केली. काही दिवसापूर्वी केसगळतीच्या गूढ आजाराचे जास्त प्रमाण असलेल्या चार गावातच नखगळतीचे रुग्ण आढळून आले आहे, हे विशेष.

भोनगाव प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गतच्या कालवड गावात नखगळतीचे सर्वाधिक म्हणजे १३ रुग्ण आढळून आले आहे. काठोरा गावात १०, मच्छिन्द्रखेड मध्ये ७ तर बोन्डगाव मध्ये ७ रुग्ण आढळून आले आहे. आजअखेर ३७ रुग्ण आढळून आले आहे. परिणामी या चार गावांसाह शेगाव, खामगाव आणि शेगाव तालुक्यातील टक्कलबाधित सोळाएक गावात आता नखगळतीच्या विचित्र आजाराची भीती पसरली आहे. काल गुरुवारी जिल्हा साथ रोग अधिकारी डॉ. प्रशांत तांगडे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य विभाग चमूने सर्वेक्षणवजा पाहणी केली होती. आज शुक्रवारी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजीत मंडाळे हे शेगावमधीत नखगळतीबाधित गावांची पाहणी करणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सेलिनियमचा फटका?

केसगळती झालेल्या रुगानांची नखं कमजोर होऊन विद्रूप झालेली नखं गळून पडत आहे. जानेवारी २०२५ मध्ये शेगाव, नांदुरा, खामगाव तालुक्यातील अनेक गावात अचानक केसगळतीने नागरिक हैराण झाले होते. आता केसगळती झालेल्या रुग्णांची नखे अचानक विद्रूप होऊन नखे कमजोर होऊ लागली आहेत, तर अनेकांची नखे गळून पडली असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आल आहे. बाधित व्यक्तींच्या शरीरातील सेलिनियमचे प्रमाण वाढल्याने नखगळती होत असल्याचा यंत्रणांचा प्राथमिक अंदाज आहे. वैद्यकीय संशोधक पद्मश्री हिंमतराव बावस्कर यांनी केलेल्या तपासणीत काही केसगळतीबाधित रुग्णांच्या शरीरात प्रतिलिटर ४ ते ५ हजार मायक्रोग्रामदरम्यान सेलिनियम आढळून आले होते. सामान्य स्थितीत हे प्रमाण लिटरमागे ५८ ते २३४ मायक्रोग्राम इतके राहते. प्रामुख्याने शासनाकडून पुरविण्यात येणाऱ्या धान्यामुळे हे प्रमाण वाढल्याचा निष्कर्ष डॉ. बावस्कर यांनी काढला होता.