विदर्भातील शिक्षण क्षेत्रात सर्वाधिक व्याप्ती असलेल्या श्री. शिवाजी शिक्षण संस्थेच्या कार्यकारी परिषदेच्या निवडणुकीत ‘शिवपरिवारा’ने अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या हाती पुन्हा एकदा संस्थेची धुरा सोपवली आहे. हर्षवर्धन देशमुख यांच्या प्रगती पॅनेलने नऊ पैकी आठ जागा जिंकून कार्यकारिणीवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या निवडणुकीत माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे, विधानसभेचे माजी उपाध्‍यक्ष शरद तसरे, प्रख्‍यात कवी विठ्ठल वाघ या दिग्‍गजांना पराभव पत्‍करावा लागला.

प्रचारादरम्‍यान उफाळून आलेला देशमुख-पाटील वाद, मतदानादरम्‍यान धक्‍काबुक्‍की आणि आरोप-प्रत्‍यारोपाने गाजलेल्‍या या निवडणुकीत नरेशचंद्र ठाकरे यांच्‍या गटाला संस्‍थेच्‍या मतदारांनी नाकारले. अध्‍यक्षाला दुसऱ्यांदा संधी देण्याची परंपरा यावेळीही पाळली गेली. अध्‍यक्षपदी हर्षवर्धन देशमुख निवडून आले, त्‍यांनी विकास पॅनेलचे नरेशचंद्र ठाकरे यांचा ११७ मतांनी पराभव केला. हर्षवर्धन देशमुख यांना ३८९ तर ठाकरे यांना २७२ मते मिळाली. उपाध्‍यक्षपदी प्रगती पॅनेलचे अॅड गजानन पुंडकर, अॅड जयवंत पाटील पुसदेकर हे निवडून आले.

हेही वाचा : ‘डिजिटल इंडिया’त ३० टक्के ग्रामपंचायतींनाच ‘नेट’जोडणी; महाराष्ट्राचे प्रमाण ४४ टक्के

तिसऱ्या जागेवर विकास पॅनेलचे केशवराव मेतकर हे निवडून आले. पुंडकर यांना ३९२, अॅड पाटील यांना ३१८ तर केशवराव मेतकर यांना २९५ मते पडली. विकास पॅनेलचे उपाध्यक्ष पदाचे उमेदवार शरद तसरे, डॉ. विठ्ठल वाघ हे दिग्‍गज पराभूत झाले. कोषाध्‍यक्षपदी दिलीपबाबू इंगोले हे पुन्‍हा निवडून आले. त्‍यांनी विकास पॅनेलचे बाळासाहेब वैद्य यांचा पराभव केला. इंगोले यांना ४२४ तर वैद्य यांना २४२ मते मिळाली. चार सदस्‍यपदांसाठी एकूण दहा उमेदवार रिंगणात होते. या पदांवर प्रगती पॅनेलचे हेमंत काळमेघ, केशवराव गावंडे, सुरेश खोटरे आणि सुभाष बन्‍सोड हे निवडून आले. हेमंत काळमेघ यांना सर्वाधिक ४९० मते मिळाली. केशवराव गावंडे यांना ३८७, सुरेश खोटरे यांना ३३१, सुभाष बनसोड यांना २८० मते प्राप्‍त झाली.
अध्‍यक्ष, उपाध्‍यक्ष, कोषाध्‍यक्ष आणि सदस्‍य अशा एकूण नऊ पदांसाठी रविवारी निवडणूक पार पडली. एकूण ७७४ मतदारांपैकी ६७२ मतदारांनी आपला हक्‍क बजावला. सायंकाळी ७ वाजेपासून मतमोजणीला सुरूवात झाली. ती रात्री एक वाजता आटोपली.

हेही वाचा : नागपूर : गडकरींच्या सूचनेनुसार कृषी धोरणात बदल करण्याची तयारी – कृषिमंत्री अब्दुल सत्तार

धक्‍काबुक्‍कीचे गालबोट

मतदान प्रक्रियेदरम्‍यान आमदार देवेंद्र भुयार यांनी मतदान कक्षात प्रवेश केल्‍याने विरोधी नरेशचंद्र ठाकरे गटाच्‍या कार्यकर्त्‍यांनी त्‍यावर आक्षेप घेतल्‍याने वाद उफाळून आला होता. यावेळी भुयार यांना झालेली धक्‍काबुक्‍की, गोंधळ, गर्दी पांगवण्‍यासाठी पोलिसांनी केलेला सौम्‍य लाठीमार याचे गालबोट लागले. पण, नंतर हर्षवर्धन देशमुख आणि नरेशचंद्र ठाकरे यांनी एकत्र येऊन कार्यकर्त्‍यांना केलेले शांततेचे आवाहन देखील लक्षवेधी ठरले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संस्‍थेचा व्‍याप

बहुजन हिताय, बहुजन सुखाय हे ब्रीद वाक्‍य प्रत्यक्षात उतरवीत ग्रामीण भागातील बहुजन, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची दारे उघडी करण्यासाठी डॉ. भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख यांनी डिसेंबर १९३२ मध्ये श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली. एका प्राथमिक शाळेपासून लावलेल्या या इवल्याशा रोपट्याचे आज संपूर्ण विदर्भात २७८ शाळा, महाविद्यालये आणि वसतिगृह रूपाने विशाल वटवृक्षात रूपांतर झाले आहे.