अमरावती : येथील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) वैद्यकीय चमूने एका ५३ वर्षीय पुरुषाच्या अतिशय गुंतागुंतीच्या ‘हेड अँड नेक’ (डोके आणि मान) कर्करोग शस्त्रक्रियेत मोठे यश मिळवले आहे. विशेष म्हणजे, या रुग्णाच्या घशातील काढण्यात आलेल्या गाठीचे वजन तब्बल दोन किलोच्या आसपास होते. अमरावतीत इतक्या मोठ्या आणि जटिल स्वरूपाची ही पहिलीच शस्त्रक्रिया मानली जात आहे.
अमरावती येथील रहिवासी असलेल्या या ५३ वर्षीय रुग्णाचे वजन २०० किलोहून अधिक होते. अशा अतिवजन असलेल्या रुग्णावर शस्त्रक्रिया करणे हे वैद्यकीय दृष्ट्या अत्यंत कठीण मानले जाते. त्याहून गंभीर म्हणजे, कर्करोगाची गाठ जीभ, गळा, मानेच्या मागील भागासह रक्तवाहिन्यांवर आणि टाळूवरही चिकटलेली होती. ‘ओरोफॅरिन्क्स’ (घशाची पोकळी), ‘लॅरिन्गोफॅरिन्क्स’ (स्वरयंत्राचा खालचा भाग) आणि ‘नेझोफॅरिन्क्स’ (घशाचा वरचा भाग) अशा विस्तृत भागांमध्ये हा कर्करोग पसरलेला होता.
रुग्णाची ही गुंतागुंतीची आणि जीवघेणी स्थिती लक्षात घेऊन रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे आणि विशेष कार्य अधिकारी डॉ. मंगेश मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्करोग तज्ज्ञ डॉ. रणजीत मांडवे यांच्या नेतृत्वाखालील चमूने हे आव्हान स्वीकारले.
गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करून रुग्णास नवजीवन देण्यात डॉक्टरांना यश आले. विशेष म्हणजे, ही संपूर्ण शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत विनामूल्य करण्यात आली. या यशस्वी शस्त्रक्रियेत डॉ. रणजीत मांडवे (कॅन्सर तज्ज्ञ), बाधिरीकरण तज्ज्ञ डॉ. राखी वानखडे व डॉ. माधुरी गाडेकर यांचा महत्त्वाचा सहभाग होता. अधिसेविका चंदा खोडके यांच्या सूचनेनुसार इन्चार्ज सिस्टर बिल्कीस शेख, जया वाघमारे, ज्योत्स्ना मुंदाने, कोमल खाडे, करण सरदार, वंदना जाधव, पायल अंभोरे, शंकर झायटे, सचिन शेरे, लक्ष्मी सोनवणे, शंकर गणोरकर आदी परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले.
डोके आणि मानेचा कर्करोग म्हणजे काय?
डोके आणि मानेचा कर्करोग हा शब्द डोके आणि मानेच्या ऊती आणि अवयवांमध्ये विकसित होणाऱ्या कर्करोगाचे वर्णन करण्यासाठी वापरला जातो, जसे की तोंड, घसा, नाक आणि सायनस. डोके आणि मानेचा कर्करोगाचे सामान्य प्रकार म्हणजे घशाचा कर्करोग, तोंडाचा कर्करोग, स्वरयंत्राचा कर्करोग आणि नाकाच्या पोकळीचा कर्करोग.
डोके आणि मानेच्या कर्करोगाच्या उपचारांसाठी अनेकदा शस्त्रक्रिया, रेडिएशन थेरपी आणि केमोथेरपीचे संयोजन आवश्यक असते. कर्करोगाच्या ऊती काढून टाकण्यात आणि रोगाचा प्रसार रोखण्यात शस्त्रक्रिया महत्त्वाची भूमिका बजावते.
