गडचिरोली : आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे मुलचेरा तालुक्यातील लगाम, येल्ला पारिसरात मागील वीस दिवसांपासून डेंग्यूचा उद्रेक झाला असून १५ ऑगस्टरोजी काकरगट्टा गावातील आणखी एका महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे डेंग्यू बळीची संख्या पाचवर गेली आहे. तत्पूर्वी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कर्तव्यात कसूर करणाऱ्या डॉक्टरला कार्यमुक्त केले. तर दोन आरोग्य सहायकांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले असून दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. सद्या या परिसरात शंभरहून अधिक रुग्ण आहेत.
लगाम, येल्ला येथे ६ ऑगस्टला पहिला रुग्ण आढळला. मात्र, याची माहिती तेथील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय तसेच लगाम प्राथमिक आरोग्य केंद्राने जिल्हा मुख्यालयाला कळविली नाही. त्यामुळे डेंग्यूची साथ पसरली. यातून नंतर लागोपाठ चार मृत्यू झाले, तर तब्बल ९४ रुग्णांचे रक्तचाचणी अहवाल सकारात्मक आढळले. यामुळे एकच खळबळ उडाली. यासंदर्भात ‘लोकसत्ता’ने वृत्त प्रकाशित करून लक्ष वेधल्यानंतर जिल्हा परिषदेचे सीईओ सुहास गाडे यांनी १४ ऑगस्ट रोजी लगामचे कंत्राटी वैद्यकीय अधिकारी डॉ. ओंकार कोल्हे यांना सेवेतून कार्यमुक्त केले आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. गेडाम आणि डॉ. विनोद म्हशाखेत्री यांची विभागीय चौकशी प्रस्तावित केली आहे. यासोबतच प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहायक अशोक डोंगरवार व लगाम प्राथमिक आरोग्य केंद्रातील सहायक लिंगाजी नैताम या दोघांना निलंबित केले आहे. आपापल्या आरोग्य केंद्रांतील गावांमध्ये साथरोग पसरत असताना निष्काळजी केली, तातडीने उपाययोजना केल्या नाहीत, असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. दरम्यान, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी याबाबत माहिती होताच गावात धाव घेतली होती , शिवाय चौकशी अहवाल सीईओंकडे सा
आरोग्य यंत्रणा परिसरात सक्रिय
जिल्हा मुख्यालयाला डेंग्यू प्रादुर्भावाची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे आणि जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. पंकज हेमके यांच्या नेतृत्वात आरोग्य विभागातील पन्नासहून अधिक कर्मचारी व अधिकारी डेंग्यू प्रभावित भागात सक्रिय झाले आहे. प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी आवश्यक सर्व साहित्य देखील त्या परिसरात पोहोचविण्यात आले आहे. त्यामुळे लवकरच परिस्थिती नियंत्रणात येईल, असे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
सहपालकमंत्र्यांनी अहवाल मागवला
जिल्हा नियोजन समिती बैठकीत आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला, त्यास उत्तर देताना जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी उपरोक्त कारवाईची माहिती दिली. एकीकडे साथरोग पसरत असताना दुसरीकडे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विनोद मशाखेत्री यांना जिल्हा हिवताप अधिकारीपदाचा पदभार दिला जात होता. याबाबत बैठकीनंतर माध्यमांनी विचारले असता सहपालकमंत्री ॲड. जयस्वाल म्हणाले, या प्रकरणात सविस्तर अहवाल मागविणार असून, कोणाचीही गय करणार नाही.