भंडारा : बाल विवाह हा कायद्याने गुन्हा आहे. बालविवाहाच्या प्रतिबंधासाठी शासनाने कायदा केला आहे. परंतु ग्रामीण व दुर्गम भागात आजही बालविवाह केले जातात. भंडारा जिल्ह्यात अशाच एका बालविवाहातून सात महिन्यांच्या गर्भवती मुलीची प्रकृती ढासळली. हे प्रकरण उघडकीस येताच एकच खळबळ उडाली. उल्लेखनीय बाब म्हणजे दोन वर्षांपूर्वी भंडारा जिल्हा बालविवाह रोखण्यात राज्यात पहिल्या क्रमांकावर होता.

गोंदिया जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीचा विवाह भंडारा जिल्ह्यातील एका मुलासोबत लावून देण्यात आला विशेष म्हणजे या मुलाचे वय देखील सतरा वर्ष आहे. विवाहित अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्यानंतर ती सात महिन्यांची गर्भवती झाली. या प्रकरणी मोहाडी तालुक्यातील करडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर घटना गोंदिया जिल्ह्यातील दवनीवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असल्याने सदर प्रकरणात गुन्हा दाखल करून दवनिवाडा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. यातील अल्पवयीन पीडिता निशा (नाव बदलले) हिच्या तक्रारीवरून आरोपी वडील प्रल्हाद शलिकराम शिवणकर (४०), आई लता शालिक राम शिवणकर (३५), रा. अर्जुनी जि गोंदिया, प्रकाश शालीकराम शेंदरे (४०) सासरे, गीता प्रकाश शेंदरे (३५) सासू, अक्षय प्रकाश शेंदरे (१७) पती रा. खांबा/जांभली, साकोली ( हल्ली मुकाम नरशिहटोला, मोहाडी) यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

पीडित मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती तिच्या आईवडिलांना तसेच सासू सासऱ्यांना होती. तरीही त्यांनी तिचं लग्न लावून दिलं. लग्नानंतर आरोपी पतीने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याने ती अल्पवयातच सात महिन्यांची गर्भवती झाली. या प्रकरणाची तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपींविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६ आणि लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण कायदा (पोस्को) २०१२ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

आरोपींमध्ये पीडितेचे वडील, आई, सासरे, सासू आणि पती यांचा सामावेश आहे. सर्व आरोपी हे मोहाडी तालुक्यातील रहिवासी आहेत. पोलिसांनी सर्व आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली असून प्रकरणाचा पुढील तपास दवनीवाडा पोलीस ठाण्याकडे सोपवण्यात आला आहे.

बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार विवाहासाठी मुलीचं वय १८ आणि मुलाचं वय २१ वर्ष निश्चित करण्यात आलं आहे. विवाहावेळी जर मुलीचं वय १८ पेक्षा कमी आणि मुलाचं वय २१ पेक्षा कमी असेल तर हा बालविवाह मानला जातो. याशिवाय, पोस्को कायद्यांतर्गत अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध ठेवणं हा गंभीर गुन्हा आहे. या प्रकरणाने राज्यात पुन्हा खळबळ उडाली असून अशा घटनांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्या, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. तसेच या घटनेमुळे बालविवाह आणि अल्पवयीन मुलींच्या संरक्षणाबाबत समाजात जागरूकता निर्माण करण्याची गरजही पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

सन २०२२-२३ मध्ये भंडारा जिल्हा बालविवाह प्रतिबंध करण्यास महाराष्ट्रामध्ये पहिल्या क्रमांकावर होता. भंडारा जिल्ह्यात १ एप्रिल ते २०२२ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीपर्यंत १० बाल विवाहाचे प्रकरणे हाताळण्यात आली होती. यामध्ये ३ प्रकरणात गुन्हे दाखल झाले होते. भंडारा जिल्ह्यात गत पाच वर्षांत २० बालविवाह उघडकीस आले असून, यामध्ये जिल्हा महिला व बाल विकास विभागाला मोठे यश मिळाले होते. असे असताना बालविवाह बालविवाहाचे सत्र थांबत नसल्याने समाजात पुन्हा जनजागृती करण्याची गरज आहे.