scorecardresearch

भंडारा : जलशुद्धीकरण केंद्र बनले मद्यपींचा अड्डा, नागरिकांच्या आरोग्याशी होतोय खेळ

जलशुद्धीकरण केंद्रावर दारू पार्टी करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

भंडारा : जलशुद्धीकरण केंद्र बनले मद्यपींचा अड्डा, नागरिकांच्या आरोग्याशी होतोय खेळ
भंडारा : जलशुद्धीकरण केंद्र बनले मद्यपींचा अड्डा, नागरिकांच्या आरोग्याशी होतोय खेळ

शुद्ध पाणीपुरवठा व्हावा यादृष्टीने जल प्राधिकरण योजनेअंतर्गत अंदाजे ३ कोटी रुपये खर्चून जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले. मात्र गावकरी अजूनही शुद्ध पाणी मिळेल या प्रतीक्षेत आहेत. याउलट या जलशुध्दीकरण केंद्राचा परिसर आता मद्यपींचा अड्डा झाला असून परिसरात सर्वत्र दारूच्या रिकाम्या बाटल्या आणि फुटलेल्या बाटल्यांची काच दिसून येत आहेत.

भंडारा तालुक्यात वरठी येथील जलशुद्धीकरण केंद्रावर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. जलशुद्धी केंद्रावर दारूच्या रिकाम्या बाटल्या पडलेल्या असल्याची चित्रफीत सध्या समाज माध्यमांवर प्रसारित होत आहे. ग्रामपंचायत मात्र अजूनही निद्रिस्त आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करत जलशुद्धीकरण केंद्रावर दारू पार्टी करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. जलशुद्धीकारण केंद्र परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्या कॅमेर्‍यांच्या सहाय्याने दारू पार्टी करणाऱ्यांचा शोध घेऊन सखोल चौकशी करण्याची मागणी वरठी ग्रामस्थांनी केली आहे.

हेही वाचा : दक्षिण कोकण आणि कोल्हापुरात वाघांच्या अस्तित्वावर मोहोर -वनविभाग आणि शास्त्रज्ञांना आठ वाघांचे दर्शन

धडा शिकवणार

आम्ही परमात्मा एक सेवक असून ग्रामपंचायतीच्या वतीने जर अशाप्रकारे पाणीपुरवठा करून आमचा धर्म भ्रष्ट केला जात असेल तर परमात्मा एक सेवक नक्कीच धडा शिकवणार आहेत. या प्रकरणाची गांभीर्यपूर्वक चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. – पवन वाघमारे, परमात्मा एक सेवक, वरठी

हेही वाचा : नागपूरच्या संत्र्यांमुळे हरवलेल्या बालकाला आई-वडिलांचे वात्सल्य पुन्हा मिळाले

…तर कारवाई करणार – सरपंच

पाणीपुरवठा केंद्रावर दारूच्या बाटल्या असल्याची कबुली देत जैविक तपासणीसाठी पिण्याच्या पाण्याचे नमुने घेण्यात आले आहे. या बाटल्या कबाडीच्या दुकानातून विकत आणलेल्या आहेत. मात्र तरीही पाणीपुरवठा केंद्रावर कार्यरत कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली असून कर्मचारी दोषी असतील किवा केंद्रावर अनैतिक कामे होत असतील तर, दोषींवर निश्चित कारवाई करू, अशी माहिती सरपंच श्वेता येळणे यांनी दिली.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या